सर्व सचिवांना नागपूर अधिवेशन दौरा सक्तीचा 

अमित गोळवलकर
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

काही कारणांमुळे अधिवेशनाच्या काळात नागपूरबाहेर जाणे भागच पडल्यास या सचिवांना मुख्य सचिवांची आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल. 

पुणे - आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या सर्व विभागाच्या सचिवांना विधिमंडळ कामकाजाच्या दरम्यान सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित रहावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांना त्यांच्या खात्यांविषयी येणाऱ्या प्रश्नांना अचूक उत्तरे देता यावीत, यासाठी सर्वांना हा नागपूर दौरा सक्तीचा करण्यात आला आहे. 

खुद्द राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या स्वाक्षरीनेच हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, सर्व खात्यांचे प्रधान सचिव आणि सचिवांना नागपूरला उपस्थित रहावे लागणार आहे. काही कारणांमुळे अधिवेशनाच्या काळात नागपूरबाहेर जाणे भागच पडल्यास या सचिवांना मुख्य सचिवांची आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल. 
ज्या दिवशी खात्याविषयीचे प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा तास चर्चा, अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चा आणि मतदान असेल त्या दिवशी या सचिवांना संबंधित सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित रहावे लागेल. दुसऱ्या सभागृहाच्या गॅलरीत त्यांचे निकटतम कनिष्ठ सहकारी उपस्थित राहतील, असे या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

या सचिवांना केवळ मंत्र्यांना माहिती पुरविण्याचेच काम करावे लागेल असे नसून विधिमंडळ सदस्यांकडून आलेल्या प्रश्नांची परिपूर्ण आणि सर्वसमावेशक उत्तरे दिली जातील हे पाहण्याचे कामही या सचिवांना करावे लागणार आहे. त्याचा अहवाल या सचिवांना मुख्य सचिवांकडे दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सादर करावा लागणार आहे. एकूणच राज्याच्या सचिवांना नागपूरची थंडी सक्तीने अनुभवावी लागणार हेच या आदेशाव्दारे स्पष्ट होत आहे.
 

Web Title: nagpur winter session compulsary for all secretaries