नाणार विदर्भात न्या आणि पावसाळी अधिवेशनही घ्या - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - कोकणात नाणार प्रकल्प नको असेल तर तो विदर्भात आणण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यासाठी आज भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. "अधिसूचना रद्द झाली असल्याने कोकणात हा प्रकल्प होणार नाही हे सरळ आहे. तो जरूर विदर्भात जावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा निर्णय घेतला तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात नेण्यास पाठिंबा देऊ,' असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

हा प्रकल्प विदर्भात झाला तर तेथे एक लाख रोजगार तयार होतील.

सागरकिनाऱ्यापासून दूर भारतात सहा ते सात रिफायनरीज आहेत, त्यामुळे काटोल येथे माझ्या मतदारसंघात हा प्रकल्प उभारण्यास मी तयार असल्याचे देशमुख म्हणाले. यासंबंधात त्यांनी प्रदीर्घ निवेदन तयार केले आहे. ते वाचून उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या अभ्यासाची प्रशंसा केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि या भागाचे खासदार विनायक राऊत या वेळी हजर होते.

हा प्रकल्प कोकणात जाणार नाही हे निश्‍चित आहे; पण गुजरातमध्ये न जाता तो विदर्भात रोजगारनिर्मिती करत असेल तर आमचा त्याला पाठिंबा आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

Web Title: nanar project vidarbha rainy session uddhav thackeray