भाजपची 'ऑफर' जुनीच; मी स्वस्त नाही : राणे

टीम सरकारनामा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती. मी अमित शहांच्या घरी गेलेलो नाही. कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, इतका मी स्वस्त नाही. 
- नारायण राणे

मुंबई : पक्ष बदलायचा असता, तर मी आधी कुणाला भेटायला गेलो नसतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज (गुरूवार) कथित भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये जाणार की नाही, या प्रश्नावर त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना थेट उत्तर देणे टाळले; मात्र, 'मी एवढा स्वस्त नाही,' असे विधानही त्यांनी एका प्रश्नावर केले. 

राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे बुधवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचे वृत्त होते. राणे आणि फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करतानाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे राणे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर राणे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांसोबत यापूर्वी दोनवेळा प्रवास केला आहे. काल मी अहमदाबादेत होतो, पण अमित शहांना भेटलो नाही. मी कोणालाही भेटलो नाही. वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला गेलो होतो. आज सकाळी पावणे सात वाजता मुंबईत आलो आहे. पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो; थेट निर्णय घेतला असता. देवेंद्र फडणवीस आणि शहांना भेटलो असतो, तर लपून राहिलं नसतं.'

'भाजपकडून जुनीच ऑफर, मी त्यांना हो ही म्हणालो नाही आणि नाहीही म्हणालो नाही,' असेही राणे यांनी सांगितले. 

अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती. रात्री साडेदहानंतर मी कुठेही जात नाही; त्यामुळे कुणाला भेटण्याचा प्रश्नच नाही. मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडीओ आहे का? कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त नाही मी,' असे विधान राणे यांनी केले. 

'परवा जयकुमार रावल घरी आले होते, त्यांच्याशी हॉलमध्ये बसून पक्षबदलाची चर्चा करु का? भाजपकडून ऑफर येते. मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना! मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात दोनदाच भेटलो,' असेही राणे यांनी स्पष्ट केले. 

'निर्णयाच्या वेळेला बोलेन, तेव्हाचं तेव्हा,' असे सांगत राणे यांनी 'राहुल गांधींनी सर्व ऐकून घेतलं, मात्र माझ्या तक्रारीचं निवारण केलेले नाही,' असे सांगितले.