राणेंच्या भाजप प्रवेशाचे अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाबाबत आज चर्चेचे गुऱ्हाळ कायम राहिले. नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांचे पुनर्वसन कसे करायचे याबाबतच्या वाटाघाटी अजून सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. 

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाबाबत आज चर्चेचे गुऱ्हाळ कायम राहिले. नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांचे पुनर्वसन कसे करायचे याबाबतच्या वाटाघाटी अजून सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. 

नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू असतानाच कालच्या अहमदाबाद दौऱ्यामुळे हे प्रकरण पुन्हा तापले आहे. कॉंग्रेसमुक्‍त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचलणाऱ्या भाजपने येणाऱ्या प्रत्येक नेत्याचे स्वागत करण्याचे धोरण तत्त्वतः मान्य केले असले, तरी महाराष्ट्रातील फायर ब्रॅण्ड नेते नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत दोन्ही बाजूंकडून किंतुपरंतु आहेत. राणेंनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली, तरी प्रत्यक्षात पक्षाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने राणे यांनी भाजपबरोबरील संपर्काचे दरवाजे पुन्हा उघडले. राणे यांच्या वादळी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना घ्यायचे की नाही याबद्दल राज्यातील काही भाजप नेत्यांची वेगवेगळी मते आहेत. आक्षेप बाजूला ठेवून त्यांना पक्षात घेतलेच तर निवडून आणण्यापासून त्यांच्या पुत्रांचे पुनर्वसन सध्या करणे अशक्‍य असल्याने भाजप नेत्यांसमोरही पेच आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांनी जिल्हा परिषद एकहाती जिंकली तरी पिता-पुत्र "लोकसभा' जिंकू शकतील का, शिवसेनेचा प्रभाव असलेल्या या क्षेत्रात भाजपला खरेच त्यांना आव्हान द्यायचे आहे का, असे प्रश्‍नही आहेत. त्यातच राणे यांच्या काही आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच, बेलगाम वक्‍तव्ये करणारे राणे कितपत उपयोगी ठरतील याबद्दल राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही शंका व्यक्‍त केल्याचे समजते. 

राणेंनी केलेल्या आरोपांना विधान परिषदेत यशस्वी उत्तरे देणाऱ्या फडणवीस यांनाही राणे तापदायक ठरतील का, असा प्रश्‍न पडला आहे. राणे यांचा भाजप प्रवेश हा कॉंग्रेस तसेच शिवसेनेलाही आव्हान देणारा ठरणारा असतानाही भाजपला निर्णयाबद्दलची संदिग्धता संपवता आलेली नाही हे विशेष. दुसरीकडे राणेंनाही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या ताकदीची पूर्ण कल्पना असल्याने त्यांनाही ठोस आश्‍वासने हवी असल्याचे समजते. दोन्ही मुलांच्या राजकीय भवितव्याबद्दल राणेसाहेब कमालीचे हळवे असल्याचे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने नमूद केले. 

अडचणींची मालिका 
सध्या राणे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कॉंग्रेस सोडल्यास पक्षांतरबंदीचा नियम त्यांना लागू होईल व राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे लागेल. पण राणे यांचे शिवसेनेशी असणारे संबंध लक्षात घेता त्यांची मते मिळण्याची खात्री नाही. शिवसेना- भाजपचे संबंधही पूर्वपदावर आले नसल्याने, ते राणेंसाठी आश्‍वासन मिळवणे भाजपसाठी कठीण आहे. 145 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी स्वतः राणे यांना तसेच भाजपलाही शिवसेनेला गृहीत न धरता प्रयत्न करावे लागतील. राज्यसभेवरही सध्या महाराष्ट्रातून निवडून जाण्याची संधी नाही, त्यांना अन्य राज्यांमधून पाठवता येईल का, याची चाचपणी भाजप करत असल्याचे समजते. भाजप कमकुवत असलेल्या विधानसभेच्या 15 ते 16 मतदारसंघांत राणेंसारखा नेता आज उपयोगी ठरू शकतो; मात्र त्यांच्या वागण्याची हमी कशी आणि कोण देणार, असा प्रश्‍न आहे. यासंबंधात केंद्रीय मंत्री व माजी अध्यक्ष नितीन गडकरी शब्द टाकतात का, याकडेही लक्ष आहे. 

अनिश्‍चितता 
नारायण राणे यांनी थेट अहमदाबादेत अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त बाहेर येणे त्यांना अडचणीचे ठरणारे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत केलेल्या मोटार प्रवासाचा व्हिडिओ भाजपमधील कोणीतरी "व्हायरल' केल्याची शंका राणेसमर्थकांनी उपस्थित केल्याचे सांगितले जाते. राणे मनाने कॉंग्रेसमध्ये नाहीत, त्यांच्या जिल्ह्यात अध्यक्षही न नेमता दुर्लक्ष करण्याची कॉंग्रेसची भूमिका त्यांच्यासारख्या स्वाभिमानी नेत्याला भावणारी नाही. 

Web Title: Narayan Rane talk of joining BJP