टोमॅटो, कोथिंबीर, मेथी वधारली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नारायणगाव - जुन्नर बाजार समितीच्या येथील उपबाजारात गेल्या दोन दिवसांपासून टोमॅटो, कोथिंबीर व मेथीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला (वीस किलो) या हंगामातील उच्चांकी सातशे रुपये भाव मिळाला असून, कोथिंबिरीला शेकडा साडेतीन हजार रुपये भाव मिळाला आहे.

रोगाचा प्रादुर्भाव, टोमॅटो बियाण्यांतील दोष, नवीन जातीच्या संशोधनाचा अभाव यामुळे गेल्या दोन वर्षांपासून जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यात टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र लाल टोमॅटोची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली. टोमॅटो टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत आता उपबाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. 

सध्या रोहोकडी, पाचघर, वडज, येणेरे, गोळेगाव या तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील टोमॅटो उपबाजारात विक्रीसाठी येत आहे. तालुक्‍याच्या मध्य बागायती भागातील टोमॅटोचा तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सोमवारी उपबाजारात सुमारे चाळीस हजार क्रेटची आवक झाली. भुगी टोमॅटो क्रेटला दोनशे ते अडीचशे रुपयांच्या दरम्यान, तर चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला पाचशे रुपये ते सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. 

आवक घटल्याने भावात वाढ
नारायणगाव येथील उपबाजारात कोथिंबीर, मेथी, शेपूच्या सुमारे ७५ हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीर, मेथी, शेपूला शेकडा अनुक्रमे एक हजार रुपये ते साडेतीन हजार, आठशे रुपये ते एकवीसशे रुपये, आठशे रुपये ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. पावसामुळे कोथिंबीर, मेथी, शेपू भिजल्याने आवक घटल्याने मोठी भाव वाढ 
झाली आहे.