मध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी इच्छुक..!

संजय मिस्कीन
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

शिवसेनेच्या इशाऱ्यावर शरद पवार यांची घोषणा

मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात सुरू असलेला राजकीय तणाव वाढला अन् शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकांस तयारच नव्हे तर इच्छुक आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केली.

शिवसेनेच्या इशाऱ्यावर शरद पवार यांची घोषणा

मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात सुरू असलेला राजकीय तणाव वाढला अन् शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकांस तयारच नव्हे तर इच्छुक आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केली.

राष्ट्रवादीच्या वतीने आज शरद पवार यांचे 'फेसबुक लाईव्ह चॅट' आयोजित केले होते. यावेळी शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादीची भूमिका काय, या प्रश्‍नाला पवार यांनी वरील रोखठोक उत्तर दिले. सुमारे 3 लाख 88 हजार व्यक्‍तींनी या 'फेसबुक चॅट'मध्ये सहभाग घेतला. तर, पवार यांनी तब्बल दोन तास राज्य, केंद्र तसेच जागतिक पातळीवरील राजकीय घडामोडी यावर विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरं दिली.

विधानसभा निवडणुकानंतर भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, त्यावेळी नवीन सरकार अस्थिर राहू नये. राज्यातल्या जनतेला लगेचच निवडणूकांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. पण, आता तशी परिस्थीती नाही. भारतीय जनता पक्षाच्या सरकारची जनमानसातली प्रतिमा फार चांगली राहिलेली नाही. राज्यभरातले सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भाजपमध्ये राजरोसपणे घेतले जात असल्याचा संताप जनतेच्या मनात आहे. शिवाय, नोटबंदी हा भाजपचा फसलेला डाव आहे. या निर्णयातून सामान्य जनतेची फसगत झाली आहे. अनेक कामगार बेरोजगार झाले आहे. छोटे उद्‌योग बंद पडल्याने कोट्‌यावधी रूपांचे नुकसान तर झालेच आहे. किमान चार ते पाच वर्षे या उद्‌योगांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

सध्या भाजप व शिवसेना नेत्यामधे सुरू असलेल्या राजकीय तणावाबाबत पवार यांनी खंत व्यक्‍त केली. उध्दव ठाकरे आक्रमक बोलत असले तरी आश्‍चर्य मुख्यमंत्र्यांचे वाटते असे नमूद करताना ते म्हणाले की, राज्याच्या नेतृत्वाने संयमाने टिका करायला हवी. मुख्यमंत्र्यांनी शब्द जपून वापरावेत. हा तणाव मनभेदात रूपांतरीत होणार नाही याची काळजी घ्यावी. या दोन्ही नेत्यांमधे समन्वय झाला नाही अन सरकार अस्थिर झाले तर राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. राष्ट्रवादी निवडणूकांना सामोरे जाण्याचे धोरण स्विकारेल असे पवार यांनी स्पष्ट केले.

नोटबंदी हा फसलेला डाव..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय फसला असून, सामान्य जनतेला यातून काहीही फायदा झाला नसल्याची भावना वाढीस लागली आहे. आगामी निवडणूकांत जनतेच्या या रोषाचा सामना मोदी सरकारला करावा लागेल, असे शरद पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले.