शेतकऱ्याला लपविणाऱ्या पोलिसांना नेत्यांनी घेतले फैलावर

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 24 मार्च 2017

ही कुठली पद्धत...? : अजितदादांचा सवाल
आम्ही शेतकऱ्यासाठी न्याय मागायला येथे येतो. तुम्ही आम्हाला खोटी माहिती कशी देता..? सरकार कोणाचंही असेल हो, पण ही कुठली पद्धत? असा संतप्त सवाल अजितदादांनी पोलिस अधिकाऱ्यांना केला. 

मुंबई : न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाणकेल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते प्रचंड खवळले आहेत. पोलिसांच्या या बेफिकीरीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे गाठले. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह डझनभर आमदारांचा यांत समावेश होता. खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल या नेत्यांनी पोलिस अधिकारयांना चांगलेच फैलावर घेतले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला जाऊन मारहाण झालेल्या शेतकऱ्याची भेट घेतली. या नेत्यांनाही पोलिस चुकीची माहिती
 देत होते.  शेतकऱ्याला पोलिस स्टेशनच्या एका खोलीत बसवलेलं असताना त्या शेतकऱ्याला कोर्टात नेलं असल्याचे पोलिस सांगत होते. 

अजितदादांनी लावला छडा
अजित पवारांनी स्वतः फोन करून शेतकऱ्याशी संवाद साधून शहानिशा केल्यावर कळलं की संबंधित शेतकरी पोलिस ठाण्यात आहे. हे समजताच अजित पवार पोलिस निरीक्षकावर संतापले. शेतकऱ्याची बाजू ऐकून FIR करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली. 

आम्ही शेतकऱ्यासाठी न्याय मागायला येथे येतो. तुम्ही आम्हाला खोटी माहिती कशी देता..? सरकार कोणाचंही असेल हो, पण ही कुठली पद्धत? असा संतप्त सवाल अजितदादांनी पोलिस अधिकाऱ्यांना केला. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीमध्ये भुसारे (मु.पो. घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांचे मोठे नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली; मात्र आपल्याला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी शासनाकडे केली होती. मात्र, दोन वर्षे पाठपुरावा करूनही कोणीच दखल घेत नसल्याने भुसारे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचे ठरवले. त्यासाठी ते गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच सुरक्षारक्षांनी भुसारे यांना मुख्यमंत्री कार्यालयापासून मारहाण करत जबरदस्तीने मंत्रालयाच्या बाहेर नेल्याचे भुसारे यांनी "सकाळ'ला सांगितले. या मारहाणीमध्ये भुसारे यांच्या जबड्याला दुखापत होऊन रक्ताने त्यांचे कपडे माखले होते.

व्हिडीओ गॅलरी