विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत आठ लाख भाविक

अभय जोशी
मंगळवार, 4 जुलै 2017

पदस्पर्शासाठी लागतात 22 तास; मुखदर्शनाला प्राधान्य

पदस्पर्शासाठी लागतात 22 तास; मुखदर्शनाला प्राधान्य
पंढरपूर - आषाढी यात्रा सोहळ्यात सहभागासाठी आज रात्रीपर्यंत सुमारे आठ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गोपाळपूरच्या पुढे गेली होती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा रांग कमी आहे. पदस्पर्श दर्शनासाठी आज तब्बल 22 तास लागत होते. त्यामुळे यंदा मुखदर्शनाला भाविकांनी प्राधान्य दिले आहे.

आज दशमीला शहरातील गर्दी क्षणाक्षणाला वाढत होती. वाखरी (ता. पंढरपूर) येथून विविध संतांच्या पालख्या येथे आल्यावर वारकऱ्यांचा जणू महासागरच दिसत होता. ज्ञानोबा- तुकोबांच्या पालख्यांसह श्री संत निवृत्तिनाथ महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत गजानन महाराज आदी शेकडो पालख्या उत्साहात दाखल झाल्या.

वारकऱ्यांच्या दृष्टीने चंद्रभागेतील पवित्र स्नानालाही विठ्ठलदर्शनाइतकेच महत्त्व असते. "अवघीची तीर्थे घडती एकवेळा चंद्रभागा डोळा देखलिया' अशी वारकऱ्यांची भावना असते. हे लक्षात घेऊन आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येथील बंधाऱ्यातून वारकऱ्यांच्या सोईसाठी नदीत पाणी सोडले आहे. आज पहाटे चारपासूनच चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला होता.

दर्शनाची रांग मिनिटाला 45 वारकरी याप्रमाणे पुढे सरकणे अपेक्षित असताना रांगेचा वेग रविवारी खूप कमी होता. स्वच्छतेच्या कामासाठी आणि कासारघाटाजवळ घुसखोरी झाल्याने रांग पुन्हा थांबवण्यात आली. त्यामुळे रांगेतील भाविकांनी गोंधळ करून संताप व्यक्त केला. पदस्पर्श दर्शनास सरासरी 22 तासांहून अधिक वेळ लागत असल्याने हजारो भाविकांनी पाच- सहा तासांत होणाऱ्या मुखदर्शनाला पसंती दिली आहे.

आज श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या भुजंगराव हणमंत कोले (रा. सुरेगाव, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांना विचारले असता ते म्हणाले, काल (ता. 2) सकाळी आठ वाजता गोपाळपूर येथे दर्शन रांगेत उभा राहिलो होतो. आज सकाळी सहा वाजता म्हणजे तब्बल 22 तासांनी दर्शन झाले.

यंदा शहरात कायमस्वरूपी आणि तात्पुरती मिळून 5 हजार 100 स्वच्छतागृहे यात्रेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात्रेकरूंनी स्वच्छतागृहांचाच वापर करावा यासाठी जागोजागी स्वयंसेवक उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा शहरात बऱ्यापैकी स्वच्छता दिसत आहे.

ठळक मुद्दे
चंद्रभागा नदीत लाखो भाविकांचे स्नान
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी 22 तास
कीर्तन, प्रवचनात हजारो वारकऱ्यांचा सहभाग
स्वच्छतागृहांची संख्या वाढवल्याने यात्रेकरूंची सोय