राणेंच्या दुखण्यावर त्यांच्याशी चर्चा करणार - पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पंढरपूर - सध्या राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राणे विषयावर कॉंग्रेस हतबल झाल्याचे दिसत असतानाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी मात्र नारायण राणे यांना समाजावून घेत त्यांचे नेमके दुखणे काय आहे?, ते कॉंग्रेस सोडून जाण्याचा विचार का करीत आहेत. या त्यांच्या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन त्यांच्याशीच आपण चर्चा करणार असल्याचा निर्वाळा त्यांनी सोमवारी दिला.

कदम आज येथे श्रीविठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'कॉंग्रेस पक्षाने राणे पिता-पुत्रांना भरपूर दिले आहे. कॉंग्रेसने राणे यांनी विधानसभा व लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. पक्षात मानसन्मान दिला. तरीही त्यांचे काय दुखणे आहे हे त्यांना विचारू आणि भाजप प्रवेशापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करू.'' कोकण असो की मुंबई, राणे यांचा शिवसेनेने पराभव केला आहे; कॉंग्रेसने नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.

"राष्ट्रवादी' कॉंग्रेसचेच अंग
'कॉंग्रेस हा समविचारी व सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आमचेच एक अंग आहे. आम्ही त्यांना सोबत घेऊनच पुढील राजकीय वाटचाल करणार आहोत,'' असे कदम यांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमाफी जाहीर केली असली तर किती लोकांना याचा लाभ झाला आहे, हे आकडेवारी आल्यानंतरच कळेल असेही कदम यांनी सांगितले. या वेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.