विठ्ठल मंदिरात प्रक्षाळपूजेचा सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात गुरुवारी परंपरेप्रमाणे प्रक्षाळपूजेचा सोहळा भक्तिभावाने पार पडला. मंदिर समितीच्या वतीने प्रक्षाळपूजेनिमित्ताने विठ्ठलाला केशर पाण्याने स्नान घालून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा केली जाते. प्रथेप्रमाणे आजपासून देवाचे सर्व नित्योपचार सुरू झाले.

आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना दर्शन व्हावे यासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाते आणि मंदिरात दररोज होणारे काकडा, दुपारी साडेपाच वाजता पोशाख घालणे, सायंकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद केलेले असतात. आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर शुभ दिवस पाहून प्रक्षाळपूजा करण्याची प्रथा आहे. आज दुपारी 12 वाजता श्री विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. देवाला लिंबू साखर लावण्यात आले. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्यात आला. देवाला सायंकाळी रेशमी पोशाख परिधान करून विविध सुवर्ण अलंकारांनी सजविले होते.

काढा दाखवण्याची प्रथा
भक्तांसाठी अहोरात्र उभा राहून थकलेल्या विठ्ठलाचा थकवा जावा म्हणून विठुरायाला रात्री गवती चहासह 18 प्रकारच्या आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेल्या काढा दाखवण्याची प्रथा आहे. त्यानुसार रात्री काढा दाखवण्यात आला.