विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' होणार 

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' होणार 

पंढरपूर - येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच असे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. हा निर्णय विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत झाल्याचे ते म्हणाले. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बाराव्या शतकात बांधले असून मंदिराला सुमारे 900 वर्षांपूर्वीचा जुना इतिहास आहे. भविष्यात मंदिराला व भाविकांना कोणताही धोका किंवा इजा पोहोचू नये, यासाठी हा निर्णय झाला आहे. 

यापूर्वी अण्णासाहेब डांगे मंदिर समितीचे अध्यक्ष असताना विठ्ठल गाभारा सुस्थितीत राहावा यासाठी पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार बाजीराव पडसाळीजवळील स्लॅब उतरवला होता. आता डॉ. भोसले यांनी स्ट्रक्‍चरल ऑडिटबरोबरच मंदिरातील अग्निशमन व इलेक्‍ट्रीक बाबींचेही ऑडिट करण्याचे ठरवले आहे. 

मंदिर इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची जबाबदारी पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर सोपवण्यात आली आहे. या कॉलेजमधील काही तज्ज्ञ प्राध्यापकांनी नुकतीच मंदिराला भेट देऊन विठ्ठल गाभारा व मंदिरातील दगडी बांधकामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी मंदिराची छायाचित्रे अभ्यासासाठी घेतली आहेत. दहा दिवसांत त्यांचा अहवाल मिळेल. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मंदिराच्या बांधकामामध्ये सुधारणा व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. 

दर्शन मंडपाचेही ऑडिट करणार 
मंदिरासमोर 1990 मध्ये समितीने दर्शनरांगेची व्यवस्था व्हावी, यासाठी सातमजली दर्शन मंडप बांधला आहे. या दर्शन मंडपाचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे. दर्शन मंडपाबाबत वारकरी प्रतिनिधी व भाविकांची विविध मते आहेत. परंतु सध्याचा मंडप हा भाविकांच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे. त्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचा विचार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com