लोकसहभागामधून परिवर्तनाचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

दोन दिवसांच्या चर्चासत्रातून महाराष्ट्राच्या विकासाच्या कल्पना पुढे आल्या. महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिनिधींनी यात योगदान देण्याचीही तयारी दाखवली हे स्वागतार्ह आहे.  
अभिजित पवार,संस्थापक अध्यक्ष, डिलिव्हरिंग चेंज फोरम

मुंबई - ‘‘महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी लोकसहभाग आवश्‍यक आहे. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या माध्यमातून हे शक्‍य होईल. या प्रयत्नात सर्वांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहन मान्यवरांच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’च्या दोन दिवसांच्या चर्चासत्राचा आज समारोप झाला. या चर्चासत्रांतून समोर आलेल्या मुद्‌द्‌यांची मांडणी अभिजित पवार यांनी केली. या सादरीकरणाला टाटासमूहाचे रतन टाटा, सुपरस्टार अमिताभ बच्चन, उद्योजक आनंद महिंद्र, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, आयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्षा चंदा कोचर, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अभिनेत्री प्रीती झिंटा आदी उपस्थित होते.

दोन दिवसांच्या चर्चासत्रातून ‘चीफ मिनिस्टर ट्रान्सफॉर्मेशन कौन्सिल’ची स्थापना होणार असल्याचे ‘डिलिव्हरी चेंज फाउंडेशन’चे संस्थापक व अध्यक्ष अभिजित पवार यांनी सांगितले. ‘पेमांडू’च्या माध्यमातून मलेशियात परिवर्तन घडवून आणणाऱ्या दातोश्री इद्रीस जाला यांची महाराष्ट्र सरकारने मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.

‘महान राष्ट्र नेटवर्क’चे महाराष्ट्रातील एक लाखांवर प्रतिनिधी परिवर्तनाच्या या प्रयत्नात जोडले गेले असल्याची माहिती देत पवार यांनी गावातील तसेच समाजातील प्रश्‍न समजावून घेत लोकसहभागातून त्या प्रश्‍नांची उकल करण्यावर फोरमचा भर असल्याचे सांगितले. महान राष्ट्र नेटवर्क, यिन आणि तनिष्काच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटी लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहोत. बिग फास्ट रिझल्ट प्रणालीच्या माध्यमातून जलदगतीने परिवर्तन होऊ शकते, या विषयी खात्री आहे, असेही ते म्हणाले.

एखादी समस्या सोडविण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याऐवजी त्यांच्या शक्तीचा विधायक उपयोग करण्यावर ‘फोरम’चा भर असल्याचे पवार यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘यिन नेटवर्क’ तसेच ‘तनिष्का’ व्यासपीठ विधायक बदलांसाठी करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी या वेळी माहिती दिली.

फडणवीस यांनी रोटी, कपडा और मकान या जीवनावश्‍यक गरजांमध्ये आता दवाई, पढाई आणि कमाई यांची भर पडल्याचे सांगितले. समाजातील हे प्रश्‍न सोडविणे आवश्‍यक असल्याचे नमूद करत शासनाच्या प्रयत्नांना हातभार लावल्याबद्दल उपस्थित सर्वांचे आभारही मानले.

‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे दोन दिवसांचे चर्चासत्र अभिजित पवार यांनी आयोजित केले होते. यातून समोर आलेल्या कल्पना महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र