पोलिस अधिकाऱ्याविरोधात हक्कभंग आणणार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 मार्च 2017

शेतकरी मारहाणप्रकरणी विरोधक आक्रमक

शेतकरी मारहाणप्रकरणी विरोधक आक्रमक
मुंबई - गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे मदतीच्या मागणीसाठी आलेल्या रामेश्वर हरिभाऊ भुसारे (मु.पो. घाटशेंद्रा, जि. औरंगाबाद) यांना झालेल्या गंभीर मारहाणीचा मुद्दा विधिमंडळात चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात पोलिसांची भूमिका कमालीची संशयास्पद आढळल्याने मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांविरोधात विरोधकांकडून हक्कभंग आणला जाणार असल्याचे खात्रीशीररीत्या समजते.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीमध्ये भुसारी यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली; मात्र भुसारे यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. स्थानिक पातळीवर दोन वर्षे पाठपुरावा करूनही कोणीच दखल घेत नसल्याने भुसारे ही तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गुरुवारी मंत्रालयात आले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच सुरक्षारक्षकांनी भुसारे यांना मारहाण केली. त्यानंतर विरोधी पक्षांतील प्रमुख नेते आणि आमदारांनी शुक्रवारी (ता. 24) मरिन ड्राइव्ह पोलिस ठाणे गाठले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आसिम आझमी आदी नेते आणि अनेक आमदार या वेळी उपस्थित होते. संबंधित शेतकरी कुठे आहे, अशी विचारणा केली असता, त्याला न्यायालयात नेल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात, संबंधित शेतकऱ्याला पोलिस ठाण्यातच एका खोलीत डांबून ठेवल्याचे पुढे आले. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.

संबंधित शेतकऱ्याने मी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नसल्याचे सांगितले. उलट, पोलिसांनी भुसारे यांच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका कमालीची संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. तसेच, पोलिसांनी भुसारे यांच्यावर दडपशाही केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा विषय गंभीरपणे घेतला आहे.

सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा आणखीनच तापण्याची चिन्हे आहेत. आज या मुद्द्यावर विधान परिषदेचे कामकाजही ठप्प झाले. आता तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी (ता. 29) कामकाज पूर्ववत सुरू होईल. त्या वेळी विरोधकांकडून विधान परिषदेत मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास गंगावणे यांच्याविरोधात हक्कभंग आणला जाणार आहे.