आसूड यात्रेवर गुजरात पोलिसांनी उगारला 'आसूड'

ब्रह्मदेव चट्टे
गुरुवार, 20 एप्रिल 2017

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करत स्वामीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारून तात्काळ शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतत्वाखाली निघालेल्या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी गुजरातमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करत स्वामीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारून तात्काळ शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतत्वाखाली निघालेल्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी गुजरातमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तणावाचे वातावरण असून यासंबंधी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करत राज्यभरात आसूड यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेद्वारे शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या गावात ही आसूड यात्रा जाणार आहे. या गावात शेतकरी सामुदायिक रक्तदान करून शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करणार आहेत. आज गुजरातच्या हद्दीत प्रवेश करताच गुजरात पोलिसांनी परवानगी नाकारत आसूड यात्रा रोखून धरली आहे. गुजरात पोलिसांनी आसूड यात्रेत सहभागी झालेल्या आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथ पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी यांना अटक केली आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदवला आहे.

याबाबत आमदार बच्चू कडू म्हणाले,"गुजरातच्या सीमेवरच आम्ही ठिय्या करणार आहोत. गुजरात सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये असूड यात्रेस प्रवेश नाकारुन न्याय मागणी ठोकारली आहे. हे सरकार हुकूमशाहप्रमाणे वागत असून कार्यकर्त्यांचे मोबाईल सेट देखील गुजरात पोलिसांनी हिसकावून घेतले आहेत.' गुजरात सरकार विनाकारण परिस्थिती स्फोटक करत असून वातावरण दूषित करण्याचे काम गुजरातच्या पोलीसांनी केल्याचा आरोपही कडू यांनी केला.