बाळ ठाकरे म्हणायचे की बाळासाहेब ठाकरे? 

प्रकाश पाटील 
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते. हे सांगण्याची गरज आहे का ? आजही त्यांचा उल्लेख काहीजण बाळ ठाकरे करतात. मात्र तसे म्हणण्याला काहीजण विरोध करतात. बाळ किंवा बाळासाहेब ठाकरे म्हटल्याने त्यांचे महत्त्व थोडेच कमी होणार आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते. हे सांगण्याची गरज आहे का ? आजही त्यांचा उल्लेख काहीजण बाळ ठाकरे करतात. मात्र तसे म्हणण्याला काहीजण विरोध करतात. बाळ किंवा बाळासाहेब ठाकरे म्हटल्याने त्यांचे महत्त्व थोडेच कमी होणार आहे. 

लाखो तरुणांच्या हृदयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव कोरले गेले. आजही बाळासाहेबांविषयी आदर व्यक्त करतानाच त्यांच्यावर कार्यकर्त्यांचे किती प्रेम होते हे छोट्या छोट्या गोष्टीतून दिसून येते. शिवसेनेचा एक शाखाप्रमुख असलेला माझा मित्र सुनील महिंद्रकर याची यानिमित्ताने आठवण झाली. एकदा एका बातमीत बाळ ठाकरे असा उल्लेख होता. त्यावर त्याचे म्हणणे असे की, बाळासाहेब म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. त्यावर मी त्याला म्हणालो, "" एखाद्या संपादकाला किंवा वृत्तपत्राला बाळ ठाकरे असेच म्हणायचे असेल तर त्यांना सक्ती नाही करू शकत. मुळात त्यांचे नावच बाळ असे आहे.'' मात्र त्याला माझं मत पटलं नाही.

येथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते,की काही मराठी दैनिके बाळासाहेब असे कधीच म्हणत नव्हते. त्यांची कोणतीही बातमी असू द्या त्यांचा उल्लेख बाळ ठाकरे असाच होत असे. निखिल वागळेंचं त्यावेळचं सांज दैनिक महानगर आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये कधीच बाळासाहेब असे प्रसिद्ध होत नसे. पुढे मटाने साहेब लावण्यास सुरवात केली. हे सर्व आता पुन्हा का आठवले. याचे कारण असे, की मराठीतील एका प्रसिद्ध अँकरने अर्णब गोस्वामी यांच्याविषयी एक ब्लॉग लिहिला. त्याने या ब्लॉगमध्ये बाळ ठाकरे असा उल्लेख केला. बाळ ठाकरे म्हणण्याला एका वाचकाने विरोध करून थोडी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांचे म्हणणे असे की, तुमचे जेवढे वय आहे तितका त्यांनी पत्रकारितेचा अनुभव होता. मला वाटते हे बरोबर आहे. आज बाळासाहेब आपल्यात नाही. ते ज्यावेळी गेले तेव्हा ते 80 च्या जवळ पोचले होते. भारतीय राजकारणातील एक धगधगते व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे वय आणि त्यांच्याविषयी असलेला आदर लक्षात घेता त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे विरोधक आणि शिवसेनेतील कार्यकर्तेही त्यांना बाळासाहेबच म्हणत असंत. बाळचे ते बाळासाहेब झाले. आपण शरदसाहेब पवार असे म्हणत नाही. शरद पवारसाहेब असे कुठेच प्रसिद्ध होत नाही.

देवेंद्रसाहेब फडणवीस असेही कोणी म्हणत नाही. जरी आज बाळासाहेब असते आणि जर कोणी त्यांच्या नावाचा उल्लेख बाळ ठाकरे असा केला असता तरी त्यांनाही वाईट वाटले नसते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते,"" शिवसेनेत एकच "साहेब' आहेत. ते म्हणजे बाळासाहेब ! त्यामुळे पक्षातील इतर कुठल्याही नेत्यांनी स्वत:च्या नावापुढे साहेब लावू नये. पण, त्यांचे हे आवाहन फार काळ टिकले नाही. कारण शिवसेनेतच शेकडो साहेब उदयास आले आहेत. त्यांचे फ्लेक्‍स पाहिले तर हे लक्षात येईल. आजकाल अनेक फ्लेक्‍सवर उद्धवसाहेब ठाकरे असे नाव झळकलेले दिसते. शेवटी एखाद्या नेत्यांवर जिवापाड प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांना साहेब म्हणतात. ते त्यांना भावते. पण, एखाद्याला वाटले, की नाही म्हणायचे साहेब. त्यामुळे फार काही बिघडत नाही. साहेब म्हटले किंवा नाही म्हटले म्हणून त्या नेत्याचे महत्त्व काही कमी होत नाही.

बाळासाहेब मोठे नेते होते हे सांगण्याची गरज आहे का ? त्यांच्या निधनानंतर मुंबईत जो जनसागर लोटला होता. ते काय दर्शवत होते. यातच सर्वकाही आले.