नारायण राणे हा नॅशनल इश्‍यू आहे?

प्रकाश पाटील
शुक्रवार, 5 मे 2017

नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाविषयी प्रसारमाध्यमांनी इतका वेळ खर्ची केला आहे, की ज्यामध्ये समाजहित काहीच नव्हते. राणे हे मोठे नेते आहेत. त्यांच्या मागे माजी मुख्यमंत्री हे पद चिटकले आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. ते केवळ माजी मंत्री असते तर इतकी चर्चाही झाली नसती. आज राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करता आहेत. अनेक प्रश्‍न सरकारसमोर आहेत. या प्रश्‍नांसमोर राणेंचा प्रवेश हा ज्वलंत प्रश्‍न आहे असे वाटत नाही. 

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाविषयी गेले एकदोन महिने चर्चा सुरू आहे. तरीही ते भाजपमध्ये न जाता स्वपक्षात आहेत. ते भाजपमध्ये गेले काय किंवा नाही गेले त्याने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी होणार आहे की काय? की राणेंचा भाजप प्रवेश हा नॅशनल इश्‍यू आहे, हे एकदा भाजपवाल्यांनी जाहीर करावे. 

राणे यांनी राजकारणात जी काही म्हणून वर्षे खर्ची केली आहेत त्यापैकी निम्याहून अधिक वर्षे ते शिवसेनेत होते. शिवसेनाप्रमुखांच्या सावलीत कार्यकर्त्याचे नेते आणि नेत्याचे महानेते आणि मुख्यमंत्री बनले. यापेक्षा त्यांच्याविषयी अधिक काही सांगण्याची आवश्‍यकता नाही. राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राज्यात आणि केंद्रातही काँग्रेस सत्तेवर होती. त्यामुळे त्यांना हात बरा वाटला असावा. आता हात का नकोसा झाला? तर दोन्हीकडे कमळ आहे. 

ते जेव्हा भाजपमध्ये जायचे तेव्हा जातील किंवा नाहीही. मात्र त्यांना भाजपवाल्यांनीही चांगलेच खेळविलेले दिसते. भाजपमधील एक गट त्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे तर दुसरा नाही असे वृत्तही आहे. राणेंनी काँग्रेस सोडली आणि ते भाजपमध्ये आले तर शिवसेनेला सर्वांत मोठा धक्का बसेल. त्यामुळेच शिवसेनेची नाराजी ओढवून घेण्याच्या मनःस्थितीत सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत नाहीत. त्याचे एक कारण असे असू शकते की राज्यात भाजप अल्पमतात आहे. शिवसेनेच्या टेकूवर सरकारचा कारभार सुरू आहे. त्यांना पक्षात घेतल्यास शिवसेना नाराज होईल आणि पाठिंबा काढला तर जनतेतही चुकीचा संदेश जावू शकतो. शिवसेनाही त्याचे भांडवल केल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही. दोन वर्षांवर निवडणूक आल्याने राष्ट्रवादीचा पाठिंबाही मिळणे कठीण आहे. राष्ट्रवादीनेही सरकारला पाठिंबा देणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व बाजूने संकटे येण्यापेक्षा राणेंना प्रवेश दिला गेला नसावा. दुसरी गोष्ट म्हणजे राणे हे रोखठोक स्वभावाचे आहेत. ते उद्या भाजपत गेले तरी स्वस्थ बसणाऱ्यापैकी नाहीत. शिवाय राणेंना राजकारणात जे काही मिळायचे आहे ते मिळाले आहे. 2019 मध्ये नेमके काय होईल हे आताच सांगता येत नाही. निवडणुकीच्या तोंडावर कदाचित ते भाजपवासी झालेले दिसून येतील. 

राणे हे भाजपमध्ये गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशी ठोस भूमिका शिवसेना घेत नाही. ज्या शिवसेनेने राणेंना कोकणात लोळवले आहे त्यांनी एका पडेल आमदाराची इतकी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. ज्यावेळी राणेंना पाडले तेव्हा ते मंत्री होते. राणेंपूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईकांनाही असेच लोळवले आहे. उद्या ते कुठेही असोत त्यांच्याबरोबर झुंजायला तयार आहोत हा आत्मविश्‍वास पक्षात राहिला पाहिजे? राणे ज्यावेळी काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शेवटी बाळासाहेबांना उद्धव यांची ढाल बनून रणांगणात उतरावे लागले होते हा ही इतिहास आहे. पुढे उद्धव यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने त्यांना एकदा मुंबईत आणि दुसऱ्यांदा कोकणात लोळवले आहे. 

आज राणेंचा जीव काँग्रेसमध्ये रमत नाही. ते नेहमीच पक्षावर प्रहार करीत आहेत. पण, भाजपवाल्यांसारखेच काँग्रेसवालेही खूप हुशार आहेत. ते काहीच प्रतिक्रिया देत नाही. 'जायचे तर जा, राहायचे तर राहा' अशी भूमिका घेऊन गंमत पाहत आहेत. शेवटी काँग्रेस संस्कृतीत भल्याभल्यांचा जीव गुदमरतो हे पुन्हा सिद्ध होत आहे. 

राणे यांच्या भाजपप्रवेशाविषयी प्रसारमाध्यमांनी इतका वेळ खर्ची केला आहे, की ज्यामध्ये समाजहित काहीच नव्हते. राणे हे मोठे नेते आहेत. त्यांच्या मागे माजी मुख्यमंत्री हे पद चिटकले आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. ते केवळ माजी मंत्री असते तर इतकी चर्चाही झाली नसती. आज राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करता आहेत. अनेक प्रश्‍न सरकारसमोर आहेत. या प्रश्‍नांसमोर राणेंचा प्रवेश हा ज्वलंत प्रश्‍न आहे असे वाटत नाही.