β राजकारणी आणि गुंड

प्रकाश पाटील
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

एखादा गुंड थेट मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहतो तेव्हा टीका होणे स्वाभाविक आहे. बिहार-उत्तरप्रदेशात गुंडांना जी प्रतिष्ठा लाभली आहे अद्याप ते लोण महाराष्ट्रात आलेले नाही हे आपले नशीबच म्हणावे लागले. आपले नेते निदान जाहीरपणे गुंडाचे समर्थन करीत नाही हे जमेची बाजू आहे.

एखादी व्यक्ती कुख्यात गुंड असल्याचे माहीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यासोबत फोटो काढतील असे वाटत नाही. ते गुंडाचे कधीच समर्थन करणार नाहीत यावर जनतेचा विश्वास आहे. पण, त्यांचा पक्ष जेव्हा विरोधी बाकावर होता तेव्हा ते अशाप्रकरणात जे रान उठवीत होते. ते ही समर्थनीय नव्हते. हे आज म्हणावे लागेल. 

पुण्यातील एक गुंड बाबा बोडके आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. विरोधी पक्षांच्या हातात टीका करण्यासाठी आणखी एक प्रकरण आले आणि मीडियाला चघळायला एक गरमागरम विषयही मिळाला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे काही आता नवे राहिले नाही. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गुंडापुंडाचा आधार घेऊन राजकारण करण्याचे दिवस संपलेले नाही ते आजही सुरू आहे. वास्तविक विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसले की कोणतेही बेछूट आरोप करणे अगदी सोपे असते. मात्र विरोधक जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा त्यांना नक्कीच मर्यादा येतात. 

लोकशाहीत हीच तर खरी गंमत आहे. मुख्यमंत्री जेव्हा विरोधी बाकावर होते तेव्हा ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर तुटून पडत असतं. कोण एक गुंड बाबा बोडके एका बांधकाम व्यावसायिकाबरोबर गेला. कार्यकर्ते भेटीला येतात म्हटल्यानंतर त्यांची भेट घेणे साहजिक असते. त्यामुळे शिष्टमंडळात गुंड आहे, पत्रकार आहे, समाजसेवक आहे याची विचारणा काही मुख्यमंत्री करू शकत नाहीत. शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजदरबारी वेगळे महत्त्व असतेच. त्यामुळे बोडके हा कोण आहे हे त्यांना माहीत असण्याचे काही कारणही नाही. मात्र विरोधकांनी हे प्रकरण तापविलेच. खरंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना भेटायला जातात तेव्हा त्यांनीच ही काळजी घेतली पाहिजे. स्थानिक कार्यकर्त्यांनाच माहीत असते की कोण गुंड आहेत आणि कोण सामाजिक कार्यकर्ते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. या सर्व प्रकाराला स्थानिक कार्यकर्तेच जबाबदार असतात. 

यानिमित्त साधारण पाच -सहा वर्षापूर्वी राज्यात या मुद्यावरून गाजलेले प्रकरण आठवले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यामध्ये बोडके हा ही होता. त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. ते गुंडांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही तेव्हा विरोधकांनी केला होता. तसेच त्याचवेळी साताऱ्यातील एका सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कान्ह्या घोलप या गुंडाने जाहीरपणे प्रवेश केल्याने त्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले. पुढे बोडकेला पक्षातून बाहेर काढण्यात आले. मात्र अशा घटना घडत असतात. त्यामुळे पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आज सत्तेत असलेले त्यावेळी विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करीत होते आणि सत्तेत असलेले लोक आज विरोधक आहे. फरक जो काही आहे तो इतकाच. तरीही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना गुंडांना प्रवेश द्यायचा नाही असे स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. गुंडपुंडांना पक्षनिष्ठा वगैरे काही नसते. उद्या राज्यात कॉंग्रेस सत्तेवर आली तर ते त्यांच्या बाजूने राहतील. त्यामुळे प्रवेश कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही याचा विचार व्हायला हवा. बाबा बोडकेबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बोडके हा कोण हे माहिती नव्हते हे सांगितले बरेच झाले. राजकारणातील गुन्हेगारीवर भाजपने नेहमीच आवाज उठविला आहे. त्यामुळे या पक्षाकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पण, एखादा गुंड थेट मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहतो तेव्हा टीका होणे स्वाभाविक आहे. बिहार-उत्तरप्रदेशात गुंडांना जी प्रतिष्ठा लाभली आहे अद्याप ते लोण महाराष्ट्रात आलेले नाही हे आपले नशीबच म्हणावे लागले. आपले नेते निदान जाहीरपणे गुंडाचे समर्थन करीत नाही हे जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री फडणवीस गुंडाचे कधीच समर्थन करणार नाहीत यावर जनतेचा विश्वास आहे. पण, ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांचा पक्ष अशाप्रकरणात जे आरोप करीत होते ते ही समर्थनीय नव्हते हे आज म्हणावे लागेल.