शिवसेनेला झालंय तरी काय?

प्रकाश पाटील
शुक्रवार, 24 मार्च 2017

यश खेचून आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात या मागचा विचारही करायला हवा. महाराष्ट्रात खरंच शिवसेनेची स्वबळावर सत्ता येऊ शकते का ? या प्रश्‍नाचं उत्तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देऊ शकतो. पण, ममता बॅनर्जी, जयललिता यांच्याप्रमाणे येथे विजयश्री खेचून आणण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला मारहाण करून किंवा औवैसींना कानसिलात लावल्याचा अभिमान बाळगून कदापी सत्ता मिळू शकत नाही. एक व्हीजन घेऊन पुढे जाण्याची गरज आहे.

केवळ आक्रमक नेते असले म्हणजे प्रत्येकवेळी विजय मिळतोच असे नाही. राडा संस्कृती आता कालबाह्य झाली आहे. एखाद्या खासदाराला, विमान कर्मचाऱ्याला मारहाण करून एखाद्याची गाडी जाळून खूप काही हाती लागेल असे वाटत नाही. भाजपला पर्याय म्हणून जर मैदानात उतरायचे असेल तर असे प्रश्‍न हाती घ्या की लोकांनी शिवसेनेला डोक्‍यावर घेतले पाहिजे.

  • शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे?
  • कर्जमाफीवरून विधिमंडळात आक्रमक
  • काँग्रेस-राष्ट्रवादीला या मुद्यावर साथ
  • मुख्यमंत्र्यांचा फोन येताच भूमिका बदलली
  • अर्थसंकल्प सादर करण्यास पाठिंबा
  • निलंबित काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
  • विमान कर्मचाऱ्याला शिवसेना खासदाराकडून मारहाण
  • खासदार असुद्दिन ओवैसींना मारहाण
  • विदर्भवादी नेते श्रीहरी अण्णे यांची गाडी फोडली

वरील सर्व भीमपराक्रम आहेत शिवसेनेचे. कशाचा मेळ कशालाच लागत नाही. फक्त वाघाचे बछडे आहोत. आक्रमक आहोत. कायद्याला आम्ही जुमानणार नाही. तो हातातच घेणार. एक नाही पंचवीस वेळा मारल्याचा अभिमान आहे. हो मी ओवेसींना कानसुलात मारली. किती अभिमानाने आणि गर्वाने सांगितल्या जातात या गोष्टी. काय साध्य होणार आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शिवसेनेकडे आता दुसरे मुद्देच उरले नाहीत की काय ? असा प्रश्‍न या निमित्ताने विचारावासा वाटतो. शिवसेना इतकी अस्वस्थ का आहे ? नेमके काय हवे. मनासारखी शिकार मिळत नसल्याने वाघ आक्रमक झाला आहे. तो मोठी शिकार करण्यापेक्षा कोंबडी आणि शेळीची शिकार करण्यातच धन्यता मानत आहे. शिवसेनेचा सर्वांत जुना मित्र भाजप असला तरी तो एक नंबरचा शत्रू बनला आहे. भाजपनेही जे काही शत्रू वाढविले आहेत त्यामध्ये आता शिवसेनेचाही समावेश झाला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मुळात शत्रू कोण आणि मित्र कोण हे एकदाचे शिवसेनेनेही ठरवायला हवे. एकीकडे भाजपला इशारे द्यायचे आणि दुसरीकडे गोंजारले की शेपूट घालायचे हे न समजण्या इतके राज्यातील लोक नक्कीच मूर्ख नाहीत. मुळात आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची गरज असताना तसे होताना मात्र दिसत नाही.

राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने सर्वप्रश्‍न मार्गी लागलेत असे समजण्याचे काहीच कारण नाही. शेतकरी तर दररोज जीवनमरणाचा लढाई लढतो आहे. कृषिक्षेत्राबरोबरच अनेक असे प्रश्‍न आहेत की त्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडण्याची गरज आहे. मात्र नुसते हवेत कागदी बाण सोडून आणि इशारे देऊनच हा पक्ष समाधान मानत आहेत. दोन्ही काँग्रेस आक्रमक झाल्याचा दावा करीत असले तरी ते अंतर्गत मतभेदाने इतके पोखरले आहेत की कोणाचाच कुणाला पायपोस नाही. तर दुसरीकडे सत्तेत राहून दररोज शिवसेना भाजपला दूषणे देत आहे. शिवसेना का म्हणून सत्तेत आहे तेच कळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मुद्दा वास्तविक शिवसेनेने योग्य पद्धतीने हातात घेतला होता. ही मागणी तडीस नेण्याची शिवसेनेकडे हिम्मत होती. वेळप्रसंगी फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची तयारी ठेवायला हवी होती. याच मुद्यावर दोन्ही काँग्रेसबरोबर शिवसेनेने हात मिळविणेही केली. पण, मध्येच हात सोडून तिने भाजपचा हात धरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा. हा मुद्दा उरतोच. फडणवीस सरकारला आता अडीच वर्षे पूर्ण होत आहे. पुढील निवडणुकीतही युती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे आतापासून राज्यात ज्वलंत विषयावर रान पेटवून यश पदरात पाडून घेता आले असते. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे.

राज्याचा राजकारणाचा विचार केल्यास आज भाजपबरोबर लढण्याची किंवा दोन हात करण्याची ताकद दोन्ही काँग्रेसमध्ये उरली नाही. ती ताकद नकीच शिवसेनेत आहे. पण, "देव देतो आणि कर्म नेत'अशी परिस्थिती शिवसेनेकडूनच निर्माण केली जात असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा आदर्शही डोळ्यासमोर ठेवायला हवा. पुढील पाच वर्षाची तयारी आतापासूनच करा असे ठणकावून पक्षश्रेष्ठींना त्यांनी सांगितले आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या पक्षाला सत्ता किंवा घवघवीत यश मिळाले की त्यांचे कौतुक करणारे हजारो तोंडे असतात. पण, यश खेचून आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात या मागचा विचारही करायला हवा. महाराष्ट्रात खरंच शिवसेनेची स्वबळावर सत्ता येऊ शकते का ? या प्रश्‍नाचं उत्तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देऊ शकतो. पण, ममता बॅनर्जी, जयललिता यांच्याप्रमाणे येथे विजयश्री खेचून आणण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला मारहाण करून किंवा औवैसींना कानसिलात लावल्याचा अभिमान बाळगून कदापी सत्ता मिळू शकत नाही. एक व्हीजन घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. लोकांना नुसतेच गाजर दाखवू नका. पण, राज्यात शिवसेना सत्तेवर का हवी ? हे लोकांना आतापासून पटवून देण्याची गरज आहे. कोणी काही म्हणो.

पटो अगर न पटो पण महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार केल्यास संघ-भाजपने राजकारणासह सर्वच क्षेत्रात असे घट्ट जाळे विणून ठेवले आहे. पकड इतकी मजबूत केली आहे. एक बलाढ्य ताकद निर्माण केली आहे. त्याचा उपयोग कुठे ना कुठे तरी होतोच. भाजपचा विचार केल्यास शिवसेना त्या नेटवर्कवर जवळही पोचू शकत नाही. याचा कधी तरी विचार शिवसेनेच्या नेत्यांना करावा लागेल. केवळ आक्रमक नेते असले म्हणजे प्रत्येकवेळी विजय मिळतोच असे नाही. भाजपमुळे आपले नुकसान होत आहे हे उशिरा यांना कळले असेल तर नवीन मित्र शोधायला हवा. तर तसेही नाही. एकीकडे भाजपविरोधात गळा काढायचा आणि गोंजारले की सोयीची भूमिका घ्यायची. आतापासूनच जर शिवसेना भाजपला पर्याय म्हणून मैदानात उतरली तर पुढच्यावेळी वेगळे चित्र नक्कीच पाहायला मिळेल. पण, लक्षात कोण घेणार ?

Web Title: Prakash Patil's OpenSpace Article about Shivsena