नेत्यांच्या परदेश दौऱ्यांवर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - उन्हाळा सुरू झाला की नेत्यांचे अभ्यास दौरे सुरू होतात. एक तर नेते आणि अभ्यास हे गणित जुळत नाही. मुळात नेते अभ्यास करतात, हेच पटत नाही. अभ्यासच करायचा तर परदेशात का? पुणे, फुरसुंगी, देवाची उरळी येथे का नाही, असे प्रश्‍न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी हा आक्षेप नोंदवला आहे. 

पांडुरंग फुंडकर, गिरीश बापट, रामराजे निंबाळकर, नीलम गोऱ्हे, मुक्ता टिळक, संजय दत्त असे जवळपास 15 नेते सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. राज्यात तुरीचा प्रश्न चिघळलेला असताना कृषिमंत्री फुंडकर ऑस्ट्रेलियात कसला कृषी दौरा करत आहेत?, पुण्यात कचऱ्याचे ढीग लागलेले असताना बापट व टिळक ऑस्ट्रेलियात काय करत आहेत?, असे प्रश्‍न चव्हाण यांनी या पत्रात विचारले आहेत. या नेत्यांना मायदेशी बोलावण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळात माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे या कॉंग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्या दौऱ्यावरही चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. 

नेत्यांचे परदेश दौरे पर्यटन हंगामातच कसे होतात, त्यासाठी जनतेचा पैसा का वापरला जातो, दौऱ्यांमुळे किती फायदा होतो, असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत. 

दौऱ्याची रक्कम वसूल करा 
ऑस्ट्रेलियाच्या अभ्यास दौऱ्यातून गिरीश बापट व मुक्ता टिळक यांना पुण्यातील कचरा प्रश्न सोडवता आला तरी हा दौरा सत्कारणी लागला, असे म्हणता येईल. आजवरच्या सर्व अभ्यास दौऱ्यांचे मूल्यांकन करण्यात यावे. अशा दौऱ्यांमध्ये अभ्यास न करणाऱ्यांकडून त्यासाठी खर्च झालेली रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी या पत्राद्वारे केली आहे.