मोदींच्या पारदर्शक राजकारणाला जनतेचा पाठिंबा : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक राजकारणाला पाठिंबा दर्शविल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.

मुंबई - राज्यातील महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक राजकारणाला पाठिंबा दर्शविल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.

निकालानंतर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'भाजपला मिळालेले यश हे अभूतपूर्व आहे. पारदर्शकतेच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढविली. मुंबईत मिळालेल्या 81 जागा म्हणजे अभूतपूर्व यश आहे. लातूर, जालना यासारख्या ठिकाणीही भाजपने मुसंडी मारली आहे. आम्हाला मिळालेला विजय हा मोठा आहे. आम्ही तो नम्रतेने स्विकारतो. जनतेच्या विश्‍वासाला पात्र ठरण्यासाठी काय करता येईल यासाठी नियोजन करणार आहोत.' बीड जिल्हा परिषदेत भाजपला झालेल्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना फडणवीस यांनी अद्याप आपल्याकडे राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी याबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल, असे उत्तर दिले.

रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना राज्यातील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, "जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेत भाजपने क्रमांक एकचे स्थान मिळविले आहे. पंचायत टू पार्लमेंट भाजपमय व्हावे हे मोदी आणि अमित शहा यांचं स्वप्न होतं. ते आता पूर्ण झालं आहे. त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षाने योजनाबद्ध पद्धतीने प्रचार केला. योग्य वेळी प्रचाराची सुरूवात करून आम्ही योग्य आकडा गाठला आहे.'

Web Title: Public supported Modis transparent politics : CM