शेवटच्या दिवशी पीकविम्यासाठी रांगा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मराठवाड्यात गर्दी; विदर्भात कमी, तर कोल्हापुरात उदासीनता

मराठवाड्यात गर्दी; विदर्भात कमी, तर कोल्हापुरात उदासीनता
पुणे - पीकविमा मुदतवाढीसंदर्भात ठोस निर्णय केंद्र व विमा कंपन्यांकडून न झाल्याने मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आज मुदतीच्या शेवटच्या दिवशी पीकविमा उतरविण्यासाठी रांगा कायम होत्या. विदर्भात काही ठिकाणी गर्दी, तर काही ठिकाणी कमी प्रतिसाद दिसून आला. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद होता.

औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बॅंकांत गर्दी केल्याचे चित्र आजही दिसून आले. मराठवाड्यात विमा स्वीकारण्याचे काम सुरू झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी जवळपास बॅंकांच्या शाखांनी विमा स्वीकारण्यास सुरवातच केली नव्हती. त्यातच कुठे बॅंकांची स्लीप नसल्याने अडचण, तर कुठे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न, कागदपत्र वेळेत व तातडीने मिळावीत, म्हणून वाजवीपेक्षा जास्त पैसे मोजण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांची लूट झाल्याचा प्रश्न पुढे आला.

विदर्भात नागपूर विभागातील सहा आणि अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत विम्याकरिता रांगा लागल्याचे अपवादात्मक चित्र होते. एकूणच पीकविम्याबाबत शेतकऱ्यात उदासीनता दिसून आली. वऱ्हाडात पिकांचा विमा काढऱ्यासाठी बॅंकांत गर्दी होती. बॅंक उघडण्यापूर्वीच रांगा लागल्याने हजारो शेतकरी विम्यापासून वंचित असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे
कोल्हापूर : निकषात बसत नसल्याने उदासीनता
सातारा : पीकविमा भरण्यासाठी अल्प प्रतिसाद
सोलापूर : गेल्या वर्षीचे पैसे न मिळाल्याने निरुत्साह
नाशिक : पीकविमा आणि पीककर्ज भरण्यास प्रतिसाद