कर्जमाफीची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा करणार - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे - "छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजने'अंतर्गत कर्जमाफी आणि पीक विम्याच्या ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. सोमवारपर्यंत राज्यातून 32 लाख 8 हजार ऑनलाइन अर्जांची नोंदणी झाली आहे. 26 लाख 72 हजार 857 अर्ज भरण्यात आले आहेत. त्यापैकी येत्या एक ऑक्‍टोबरपासून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंकखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असे आश्‍वासन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी 34 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. कर्जमाफीमध्ये बनावट आणि फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. सोमवारपर्यंत (ता.28) राज्यातील 33 जिल्ह्यांमधून आतापर्यंत 26 लाख 72 हजार 857 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. 32 लाख 8 हजार अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्यापैकी 40 टक्के अर्ज हे पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत.

थेट बॅंकखात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी बॅंकांमधील "कोअर बॅंकिंग सिस्टिम' (सीबीएस) चा आढावा घेण्याचे काम समांतर पातळीवर सुरू आहे. तसेच जिल्हा सहकारी बॅंकांच्या शेतकऱ्यांच्या खात्यांचा देखील गावनिहाय आढावा घेतला जात आहे. 15 सप्टेंबरनंतर अर्जांची छाननी, लेखापरीक्षण करून बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

सहकार विभागाकडून राज्यभरातील कर्जमाफी आणि पीक विम्याच्या अर्जांचा आढावा घेण्यात येत आहे. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत होती. ती मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. त्यानंतर पुढील पंधरा दिवस सर्व अर्जांची छाननी होईल. एक ऑक्‍टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सहकार खात्याकडून ठेवले आहे. राज्यभरात जवळपास 32 लाख 8 हजार ऑनलाइन अर्जांची नोंदणी झाली असून, 26 लाख 72 हजार 857 अर्ज स्वीकारले आहेत. त्याची छाननी करून त्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बॅंकखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅंकांना ही रक्कम दिली जाणार नाही.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री