पुणे - पुण्यासह कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींनी सोमवारी हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी यामुळे गेल्या आठवड्यात असलेली थंडी पळाली असल्याचे निरीक्षणही खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे दक्षिण भारतात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात येत्या मंगळवारी (ता. 21) व बुधवारी (ता. 22) पाऊस पडेल. मराठवाड्यात मंगळवारी (ता. 22) पावसाची शक्यता असून, त्यानंतर तेथील वातावरण कोरडे राहील. विदर्भात हवामान कोरडे राहणार असून, तेथे अंशतः ढगाळ वातावरण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|