धनगर आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटण्याची शक्‍यता 

राजाराम ल. कानतोडे, सोलापूर 
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सोलापुरात झालेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात या जमातीची वैचारिक भूक अधोरेखित झाली. उत्साहाने ओथंबून वाहणाऱ्या या संमेलनातील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर झालेली चर्चा आत्मभान देणारी ठरली. प्रत्येक सत्रात आरक्षणाचा मुद्दा गाजत राहिला. कार्यकर्ते, साहित्यिक यांनी या संमेलनातून आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले.

सोलापुरात झालेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात या जमातीची वैचारिक भूक अधोरेखित झाली. उत्साहाने ओथंबून वाहणाऱ्या या संमेलनातील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर झालेली चर्चा आत्मभान देणारी ठरली. प्रत्येक सत्रात आरक्षणाचा मुद्दा गाजत राहिला. कार्यकर्ते, साहित्यिक यांनी या संमेलनातून आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले. 

आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह सगळ्या भागांतून जागरूक असणारा वर्ग उपस्थित होता. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी सभागृह भरले, तरी स्थानिकांचा प्रतिसाद पुरेसा नव्हता. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था नेटकी केली होती. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे दोन दिवस सलग राज्यभरातून आलेली मंडळी दिवसभर बसून ऐकण्यासाठी आसुसलेली दिसली. सगळ्या समाजातील वक्‍त्यांना स्थान, हे या संमेलनाचे वेगळेपण होते. पण अनेक वक्‍त्यांनी संमेलनाकडे पाठ फिरविली. मूळ प्रवाहात पुरेसे स्थान मिळत नसल्यामुळे हे संमेलन घ्यायला हवे, यासाठी गेले सहा महिने डॉ. अभिमन्यू टकले झटत होते. त्यांना स्वागताध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे, उद्योजक छगनशेठ पाटील, डॉ. विष्णुपंत गावडे, अमोल पांढरे अशा मंडळींनी साथ दिली. त्यातून हे संमेलन आकाराला आले. अनेक चांगल्या गोष्टी घडून आल्या तरी प्रत्यक्ष व्यासपीठावरील नियोजनाच्या पातळीवर आणखी नेटकेपणा हवा होता, असा सूर अनेकांनी व्यक्त केला. लांबलेले सत्कार, स्थानिकांचा कमी प्रतिसाद आणि राजकीय चर्चेतही या समाजाची वैचारिक भूक या संमेलनातून समोर आली. 

संमेलनाध्यक्ष संजय सोनवणी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाच्या सांस्कृतिक संचिताचा मागोवा घेतला. सातवाहन, चंद्रगुप्त मौर्य इथपासून होळकर घराण्यापर्यंत इतिहास मांडत स्वातंत्र्योत्तर काळात नागरी जीवनापासून तुटलेल्या या जमातीच्या पीछेहाटीवर मंथन करीत अभिव्यक्तीची नवी शैली विकसित करण्याचा संकल्प सोडला. छत्रपती महाराज तुकोजी होळकर आणि इंग्रजांशी झुंज देणाऱ्या आद्य स्वातंत्र्यसेनानी भीमाबाई होळकर यांच्याविषयी त्यांनी मांडलेली माहिती अनेकांना नवी होती. 

धनगर समाजाची लोकसंख्या राज्यात सव्वाकोटी आहे, तर त्या प्रमाणात समाजाचे किमान 25 ते 30 आमदार विधानसभेत हवेत, असा मुद्दा अनेक वक्‍त्यांनी मांडला. आता केवळ दोन्ही सभागृहांत समाजाचे पाच-सात आमदार आहेत. आरक्षणाच्या मुद्‌द्‌यांवर सगळीकडे दिसणारी राजकीय जुगलबंदी या संमेलनात अनुभवास आली. उद्‌घाटनाच्या सत्रात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरक्षण द्यावे; अन्यथा मराठा आणि मुस्लिम समाजासारखी आपल्या आरक्षणाची गत होईल, अशी भीती मांडली. त्यानंतर प्रत्येक सत्रात हा विषय येत गेला. समारोपाच्या सत्रात राज्याचे मंत्री राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला लोकसभा निवडणुकीत तीन सभांत आश्‍वासन दिले असल्याची आठवण करून दिली. आम्ही कॉंग्रेसइतका 60 वर्षांचा काळ मागणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. धनगर समाजामुळे राज्यात सत्तांतर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगत जर आरक्षण मिळाले नाही तर निवडणुका आहेतच, असा इशाराही त्यांनी दिला. हा आरक्षणाचा मुद्दा संमेलातील प्रत्येक सत्रात दुमदुमत राहिला. 

उशीर झाल्याने उद्योग आणि सरकारी योजनांविषयीचे पुण्याच्या गजेंद्रगडकर यांचे सत्र आटोपते घ्यावे लागले. समाजातील काही मान्यवरांना या प्रसंगी पुरस्कार देण्यात आले. तो कार्यक्रम खूप लांबला. यात समाजाचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून येण्याचा विक्रम केला, त्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनगौरव पुरस्काराचे वेगळेपण झाकोळले गेले. खासदार राजू शेट्टी, खासदार डॉ. विकास महात्मे, डॉ. यशपाल भिंगे, डॉ. जे. पी. बघेल, पत्रकार सचिन परब यांच्यासह अनेकांनी समाजाच्या प्रश्‍नांविषयी नेटकी मांडणी केली. संमेलनातील अनेक त्रुटी काढता येतील; पण तरीही समाज म्हणून धनगरांना येत असलेले आत्मभान एकूण सगळ्या समाजाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. 

पुढचे संमेलन लातुरात संमेलनात धनगर साहित्य परिषदेची घोषणा करण्यात आली. याशिवाय धनगर इतिहास परिषद स्थापन करून त्या माध्यमातून संशोधनासाठी पुढे येणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे जाहीर करण्यात आले. पुढचे संमेलन लातूरला घेण्याचे निमंत्रण मिळाले आहे. 

Web Title: The question of reservations again quite Dhangar

फोटो गॅलरी