अब आया उंट पहाड के निछे: राजू शेट्टी 

तात्या लांडगे
मंगळवार, 17 जुलै 2018

मागील कित्येक वर्षांपासून खासगी व सहकारी दूध संघचालक राज्यातील शेतकऱ्यांना लुटत आहेत. सरकारला त्याची माहिती असूनही नुसती नोटीस देण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे कलई शेतकऱ्यांची आणि मलई मात्र संघचालक खात आहेत, अशी स्थिती निर्माण झाल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍नावर सरकारने तोडगा काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांची ताकद या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला समजली. मुंबई काय पाकिस्तानमध्ये आहे काय, असे म्हणणारेच आता दूध दराबाबत तोडगा काढण्याची भाषा करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी तथा खासदार राजू शेट्टी यांनी सकाळ शी बोलताना सांगितले. अब आया उंट पहाड के निछे, असे म्हणत त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका केली. 

मुंबईला तीन दिवस पुरेल इतका दूधसाठा केल्याचे सांगणारे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना आता कशी दुधाची टंचाई भासू लागली. साठा केलेले दहा लाख लीटर दूध कोण प्याले, शेतकऱ्यांची ताकद समजली का, शेतकरी त्यांच्या हक्‍कासाठी रस्त्यावर उतरला की काय होते, याची जाणीव झाली ना, असे सवाल खासदार शेट्टी यांनी मंत्री जानकर यांना केले. खासगी दूध संघांवर नियंत्रण नसल्याने ते शेतकऱ्यांना प्रतिलीटर 15 ते 21 रुपये दर देतात तर सहकारी संघांना शासनाने आदेश देऊनही 17 रुपये दर दिला जातोय. दूध भुकटीसाठी लिटरला तीन रुपये व निर्यातीसाठी पुन्हा 50 रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यापेक्षा एक किलो भुकटीसाठी सरकारने 75 ते 80 रुपयांचे अनुदान द्यावे, जेणेकरुन खासगी अथवा सहकारी दूध संघ शेतकऱ्यांना प्रतिलीटर किमान 25 रुपये दर देतील. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलीटर पाच रुपयांचे अनुदान जमा करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार खासदार शेट्टी यांनी यावेळी केला. 

मागील कित्येक वर्षांपासून खासगी व सहकारी दूध संघचालक राज्यातील शेतकऱ्यांना लुटत आहेत. सरकारला त्याची माहिती असूनही नुसती नोटीस देण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे कलई शेतकऱ्यांची आणि मलई मात्र संघचालक खात आहेत, अशी स्थिती निर्माण झाल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Web Title: Raju Shetty criticize government on MilkAgitation