शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर शेट्टी यांची ठाकरेंशी भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - सत्तेत सहभागी असूनही त्याचे फायदे मिळत नसलेल्या नाराज घटक पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासाठी होणारे भूसंपादन, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्द्यांवर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दीड तास दोघांची चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकारच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही कर्जमाफी होत नाही. तूरडाळ व इतर शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यातच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेकडो एकर पिकाखालील जमीन सरकार ताब्यात घेणार आहे. या भूसंपादनाला शिवसेनेबरोबरच स्वाभिमानी संघटनेने विरोध केला आहे. या संघटनेच्या वतीने शहापूर येथील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी "मातोश्री' निवासस्थानी जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शेट्टी "मातोश्री'वर गेले. स्वाभिमानी संघटनेची भूमिका शिवसेनेच्या भूमिकेला पूरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शिवसेना कायम तुमच्या पाठीशी राहील. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

एकट्याने लढून भाजप दाद देत नसल्याने एकत्र आल्यास भाजपलाही विचार करावा लागेल. यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवी राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.