हजारे यांनी फुंकले सरकारविरुद्ध रणशिंग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

राळेगणसिद्धी - लोकपाल, लोकायुक्त, राइट टू रिकॉल, तसेच शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत तीव्र देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे जाहीर केले. कार्यकर्त्यांच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय शिबिराच्या समारोपप्रसंगी अण्णांनी आज सरकारविरुद्ध आंदोलनाचे रणशिंग फुंकले. 

शिबिरासाठी देशभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. समारोपप्रसंगी हजारे यांनी आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. आंदोलनापूर्वी जनजागृतीसाठी हजारे प्रत्येक राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. त्या काळातच जनआंदोलनाच्या शाखाही स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन जानेवारीत असले, तरी त्यासाठी जागा पाहण्याचे काम सुरू आहे. तसेच, यापूर्वीच्या आंदोलनात झालेल्या चुका या वेळी घडू नयेत म्हणून कार्यकर्ते पारखून घेतले जातील. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. त्यामुळे आता अशा आंदोलनातून कोणीही मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा मंत्री होणार नाही, तसेच एखादा कार्यकर्ता निवडणुकीस उभा राहिला, तर त्याला न्यायालयात खेचले जाईल, असेही हजारे यांनी जाहीर केले. 

लोकपालासाठीच्या आंदोलनाला आजपासूनच सुरवात झाल्याचे सांगून अण्णा म्हणाले, ""भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली, तरी लोकपाल कायदा अस्तित्वात आला नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला; परंतु केंद्र सरकार कोणताही प्रतिसाद देत नाही. "राइट टू रिजेक्‍ट' व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या व इतर मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात दिल्ली येथे तीव्र आंदोलन करणार आहे.''