कर्जमाफीसाठी विरोधकांचे राज्यपालांना साकडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीने रोखण्यासाठी कर्जमाफीशिवाय तरणोपाय नसून, ही घोषणा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मंगळवारी केली. 

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यपालांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) प्रा. जोगेंद्र कवाडे, संयुक्त जनता दलाचे कपिल पाटील आदी उपस्थित होते. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबाबत या वेळी राज्यपालांना माहिती देण्यात आली. शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण तातडीने नियंत्रणात आणायचे असेल तर सरकारने विशेष अधिवेशन बोलावून कर्जमाफीची घोषणा करणे अत्यावश्‍यक झाले आहे, असे विखे पाटील यांनी राज्यपालांना सांगितले. शासकीय तूर खरेदीतील अनागोंदी कारभाराबाबतही राज्यपालांना माहिती देण्यात आली. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. नुकसान भरपाई देत नाही. आता शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाची खरेदी करायला अन्‌ भाव द्यायलाही सरकार तयार नसल्याची खंत विरोधकांनी व्यक्‍त केली.