लोकायुक्‍तांकडील तक्रारीत महसूल विभाग अव्वल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - राज्यात लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांनी 28 महिन्यांत पूर्वीपासून प्रलंबित आणि नव्याने दाखल झालेल्या 12 हजार 237 तक्रारी निकालात काढल्या असून, 12 हजार 828 पैकी सर्वाधिक तक्रारींत महसूल खाते अव्वल ठरले असून, या तक्ररींची संख्या तीन हजार 30 असल्याची माहिती "आरटीआय' कार्यकर्ते अनिल गलगली यांना लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाने दिली. 114 प्रकरणांच्या शिफारशी राज्य सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत. तक्रारींची आकडेवारी पाहता दररोज सरसरी 15 तक्रारी दाखल होत आहेत.

लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयातील तपशिलानुसार 1 नाव्हेंबर 2014 पासून 28 फेब्रुवारी 2017 या कालावधीत 12 हजार 828 तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी चार हजार 622 तक्रारी प्रलंबित आहेत. 12 हजार 237 तक्रारी निकालात काढल्या असल्या, तरी त्यात 1 नोव्हेंबर 2014 पूर्वीच्या तक्रारींचा समावेश आहे. 12 हजार 828 पैकी सर्वाधिक तक्रारींत महसूल खात्याने आघाडी घेत 3 हजार 30 अशी तक्रारींची संख्या आहे. त्यानंतर नगरविकास एक हजार 936, ग्रामविकास आणि जलसंधारण एक हजार 828, गृह विभाग 886, सार्वजनिक आरोग्य खाते 421, शालेय शिक्षण आणि क्रीडा खाते 409, सार्वजनिक बांधकाम खाते 332, सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग खाते 326, जलसंपदा खाते 325, कृषी खाते 324, उच्च व तंत्र शिक्षण खाते 312 अशी क्रमवारी आहे.

Web Title: Revenue Department tops the complaint with Lokayukta