ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त! - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्राम स्वराज आणि स्वच्छ भारत अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 67 वर्षांत राज्यातील ग्रामीण भागात 50 लाख शौचालये बांधली गेली. मात्र सरकारने केवळ साडेतीन वर्षांत तब्बल 60 लाख शौचालयांची विक्रमी निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

2012 मध्ये ग्रमीण भागातील केवळ 45 टक्‍के घरांत शौचालय होते. आता मात्र प्रत्येक घरात शौचालय बांधले गेले आहे. नागरिकांनी आता शौचालय वापरण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी हागणदारीमुक्‍तीची घोषणा केली. 2012च्या बेसलाइन सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील 55 टक्‍के घरांत शौचालय बांधण्याचे काम आव्हानात्मक होते. मात्र या खात्याचे अप्पर सचिव शामलाल गोयल, तसेच अन्य सर्व अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या सर्वांची स्तुती केली.

चार हजार कोटींचा खर्च
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पंतप्रधान मोदींना भारत 2019 पर्यंत हागणदारीमुक्‍त करायचा आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने हे उद्दिष्ट 2018 मध्ये पूर्ण केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या अभियानावर एकत्रितपणे चार हजार कोटी खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली. वैयक्‍तिक आणि सार्वजनिक शौचालयाच्या बांधणीमुळे आता 351 तालुके, 27 हजार 667 ग्रामपंचायती आणि 40 हजार 500 गावे हागणदारीमुक्‍त झाली आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हागणदारीमुक्‍त झाल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक, नांदेड, यवतमाळ, भंडारा, नंदूरबार आणि गडचिरोली या जिल्ह्यांचे त्यांनी या अभियानाबद्दल विशेष कौतुक केले.

मुंबईची जबाबदारी महापालिकेची!
महाराष्ट्राचा ग्रामीण भाग प्रगतिशील असताना मुंबईतील रेल्वे लाइनवर सकाळी शौचालयासाठी अनेक जण येत असतात. या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ""महानगरातील प्रश्‍न हा महापालिकेच्या अखत्यारीत येतो. तेथे त्यासंबंधात प्रयत्न होणे गरजेचे आहे. बऱ्याच जिल्ह्यांनी ग्रामीण भागात अभिनव मार्गांचा अवलंब करून चित्र बदलले. महापालिका क्षेत्रातही अशाच प्रयत्नांची गरज आहे.''

Web Title: rural maharashtra hagandari free devendra fadnavis