जिद्द तर होतीच; पण ‘सकाळ’ने ताकद दिली! 

शैलेन्द्र पाटील 
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुण्यातूनही ऑर्डर 
पुण्यातील एका महिलेने गणेशोत्सवापूर्वी ७० मूर्ती विक्रीसाठी नेल्या. ‘शाडू कामामध्ये एवढ्या सुबक मूर्ती पुण्यात बघायलाही मिळत नाहीत,’ अशी दादही त्यांनी दिली. एका मूर्ती विक्रेत्याने पुढील वर्षीच्या उत्सवात तुम्ही तयार कराल तेवढ्या, सर्वच्या सर्व मूर्ती मी खरेदी करेन, अशी ऑर्डर आत्ताच देऊन ठेवली असल्याचे श्री. राजे यांनी कौतुकाने सांगितले. आता थोडे दिवस इकडे-तिकडे जाऊन येणार, नंतर वर्षभर माझे मूर्ती तयार करण्याचे काम सुरू ठेवणार. पुढील वर्षी शाडू व भुश्‍शामध्ये एक हजार मूर्ती तयार करण्याचा संकल्प त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सोडला. 

सातारा - ‘‘जिद्द तर होतीच, पण ‘सकाळ’ने उभे राहण्याची ताकद दिली, बळ दिले. आता गणेशमूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर करणार. पर्यावरणपूरक मूर्तीत आणखी सकारात्मक बदल घडविण्यावर काम करणार. थॅंक्‍यू सकाळ, थॅंक्‍यू सकाळ टीम’’ हे बोल आहेत, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून विकणारे कलावंत अविनाश राजे व राजे कुटुंबीयांचे! 

गेल्या दोन वर्षांत कामात राहिलेल्या त्रुटी व कटू अनुभव पाठीवर टाकून नव्या जोमाने कामाला लागलेल्या या कलावंताच्या कलेवर ‘सकाळ’ने ६ ऑगस्टच्या अंकात प्रकाश टाकला आणि श्री. राजे यांनी प्रयत्नपूर्वक तयार केलेल्या ९९ टक्के पर्यावरणीय गणेशमूर्तींना बघताबघता मागणी वाढू लागली. राजे कुटुंबीयांनी काही महिने खपून केलेल्या कष्टाला फळ मिळाले. 

येथील रविवार पेठ पोलिस चौकीसमोरील कुंभारवाड्यात राहणारे अविनाश राजे मोबाईल टॉवर उभारण्याच्या नोकरीत होते. कामे कमी होऊ लागली आणि त्यांनी ही नोकरी सोडून दिली. घरबसल्या त्यांनी गणेशमूर्ती तयार केल्या. पहिल्या वर्षी १७५ मूर्ती तयार केल्या. गणेशोत्सवात मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. इनमिन २०-२५ मूर्ती कशाबशा विकल्या गेल्या. हा पहिलाच अनुभव होता. जन्मत:च माती कामाशी नाळ जुळलेली असली तरी श्री. राजे यांच्या मागील दोन पिढ्यांनी सैन्यात नोकरी केलेली. त्यामुळे मूर्ती कलेचे संस्कार फारसे त्यांच्यावर कधी झालेच नाहीत. तरीही इंटरनेटवर माहिती शोधून पहिल्या वर्षी शाडूच्या मूर्ती तयार केल्या. त्यांना रंगही पर्यावरणपूरकच वापरले होते. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे पावणेदोनशे मूर्ती तयार केल्या. पहिल्या वर्षाच्या तुलनेत जरा बरा प्रतिसाद मिळाला. मात्र, मूर्ती विक्रीतून त्यांना मूळचे भांडवलही काढता आले नाही. दोन वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर यावर्षी त्यांनी शाडू, भुसा, कागदी लगदा आदींचा वापर करून कमीतकमी प्रदूषण करणाऱ्या गणेशमूर्ती तयार केल्या. रंगासाठी मुलतानी माती, हळद, कुंकू, कोळसा, काव, नक्षीसाठी डाळी यांचा त्यांनी वापर केला. सुमारे ४५० मूर्ती त्यांनी तयार केल्या होत्या. या मूर्ती हातोहात विकल्या गेल्या. मूर्तीकामामध्ये त्यांना पत्नी मोहिनी व बहीण निशा राजे यांची मोलाची मदत असते. अविनाश राजे सांगतात, ‘‘‘सकाळ’ पेपरने माझ्या धडपडीवर प्रकाश टाकला आणि लांबलांबचे लोक कुंभारवाड्यापर्यंत शोधत आले. कष्ट माझे असले तरी तुमची कला लोकांपर्यंत पोचली तरच त्या कलेला दाद मिळते. मला लोकांपर्यंत पोचविण्याचे  काम ‘सकाळ’ने केले. लेखणीत खरंच ताकद असते. एखाद्याला ती लोळवू शकते. तसेच ती एखादे कुटुंब उभे करू शकते. ‘सकाळ’नेच माझ्या पायात बळ दिले, हुरूप आणला. आता हाच माझा पूर्णवेळ आणि पूर्णकाळ व्यवसाय असेल.’’

Web Title: satara news sakal raje family ganesh utsav