परळमधील मैलाच्या दगडाचे जतन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - परळ येथे अतिक्रमण हटवताना सापडलेल्या दोनशे वर्षांपूर्वीच्या मैलाच्या दगडाचे जतन करण्यात येणार आहे. महापालिका "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंन्सिबिलिटी'अंतर्गत खासगी कंपनीच्या मदतीने हे काम करणार आहे. त्यानंतर शहरातील अन्य अशाच मैलाच्या 15 दगडांचे जतन करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात येईल. 

मुंबई - परळ येथे अतिक्रमण हटवताना सापडलेल्या दोनशे वर्षांपूर्वीच्या मैलाच्या दगडाचे जतन करण्यात येणार आहे. महापालिका "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंन्सिबिलिटी'अंतर्गत खासगी कंपनीच्या मदतीने हे काम करणार आहे. त्यानंतर शहरातील अन्य अशाच मैलाच्या 15 दगडांचे जतन करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात येईल. 

परळ येथील जी. एस. राव रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पालिकेच्या पथकाला हा दुर्लक्षित मैलाचा दगड आढळला होता. एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्‍वास मोटे यांनी त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासगी कंपनीच्या मदतीने हे जतन करण्यात येणार आहे. 200 वर्षांपूर्वी हा दगड जमिनीच्या चार फूट वर होता. त्यानंतर रस्त्याची उंची वाढू लागल्यावर तो पुरला जाऊ लागला. सध्या तो जमिनीच्या वर फक्त दीड फूट आहे. हा दगड बाहेर काढून पुन्हा उभारण्यात येईल व त्याचे जतन करण्यात येईल. त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येईल. याच पद्धतीने दादर येथील चित्रा टॉकीजजवळील मैलाच्या दगडाचेही जतन करण्यात येईल. त्यानंतर शहरातील मैलाच्या 14 दगडांचे जतन करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त मेहता यांना सादर करण्यात येईल. 

मालाडमधील खाणीतील दगड 
ब्रिटिशांनी 1816 ते 1837 या काळात मुंबईत 16 ठिकाणी मैलाचे दगड उभारले. फोर्ट येथील थॉमस कॅथलिक चर्चजवळ शून्य मैलाचा दगड बसवण्यात आला. माहीम कॉजवे आणि शीव किल्ल्याजवळ त्यावेळच्या शहराच्या सीमांवर शेवटचे दगड आहेत. शेवटचे मैलाचे दगड माहीम कॉजवे येथे सहा मैल आणि शीव किल्ल्याजवळ नऊ मैल अंतर दाखवतात. हे साधारण साडेचार फूट उंच बॅसॉल्ट दगड आहेत. मालाडमधील खाणीतून हे दगड आणण्यात आले होते. 

"वारसा जतन श्रेणी एक' असूनही दुर्लक्ष 
वारसा जतन समितीने अतिसंरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे ओळखून या मैलाच्या दगडांना "वारसा जतन श्रेणी एक'मध्ये समाविष्ट केले आहे; मात्र पालिकेने या दगडांच्या जतनासाठी आतापर्यंत अजिबात प्रयत्न केलेले नाहीत. काही वर्षांपूर्वी काळाघोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे तत्कालीन संचालक पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर यांनी या दगडांच्या जतनासाठी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता. त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले.

Web Title: Save the stone