सरकार पडल्यास कोणालाही पाठिंबा देणार नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

शरद पवार यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यांचे राजकारण नेहमीच बेभरवशाचे असते. केवळ सनसनाटी निर्माण करणे हे कदाचित त्यांचे प्रमुख काम असेल.
- ऍड. अनिल परब, शिवसेना आमदार

मुंबई-: शिवसेनेने पाठिंबा काढल्यावर भाजपचे सरकार कोसळणार असेल, तर आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही आणि तसे लेखी द्यायला मी तयार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मात्र, शिवसेनेनेही भाजपला पाठिंबा नसल्याचे राज्यपालांना लिहून द्यावे, असे सांगत शरद पवार यांनी सरकारचा पाठिंबा काढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडले.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढण्याची भाषा केली होती. त्याचप्रमाणे थोड्याच दिवसांत "हे' माजी मुख्यमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपला समर्थन देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मात्र, शरद पवारांच्या शब्दावर शिवसेनेचा विश्‍वास नसून शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी भाजपला साथ देईल अशी भीती शिवसेनेला वाटत असल्याचा प्रश्‍न पवार यांना करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी, "माझ्या विश्‍वासार्हतेबाबत शिवसेनेच्या प्रमाणपत्राची मला गरज नसल्याचे नमूद केले. त्याच वेळी शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही असे पत्र राज्यपालांकडे देण्याची माझी तयारी आहे. तसेच, भाजप सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र शिवसेनेनेही राज्यपालांकडे द्यावे' असे आवाहन पवार यांनी केले.

शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते पाहता सरकार कधीही अस्थिर होऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्‍त केला. शिवाय, शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करीत असली, तरी उत्तर प्रदेशप्रमाणे भाजपने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली, तर राज्यातील भाजप सरकार पाच वर्षे चालू देण्याची हमी शिवसेनेने दिलेलीच आहे. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पर्याय भाजप नक्‍कीच स्वीकारेल, असे सांगत पवार यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे निर्देशही दिले.

दरम्यान, भाजप सध्या राजकारणातल्या पारदर्शकतेबद्दल बोलते; पण सध्या महापालिकेच्या निवडणूक प्रचारामध्ये ते भरपूर पैसा आणि साधनसामग्रीसाठी खर्च करतायत. एवढी आर्थिक गुंतवणूक करण्याची शक्‍ती भाजपकडे कशी आली, हे देखील भाजपने सांगायला पाहिजे, असा टोलाही पवार यांनी लगावला. नोटाबंदीचा फटका भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांना बसला असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

मुख्यमंत्र्यांच्या कॅम्पेनची खिल्ली
भाजपचे अनेक लोक खासगीत भेटले की आमच्या पक्षाला अटलजी, अडवाणींसारखे नेतृत्व लाभले, परंतु त्यांनी कधी एककेंद्री नेतृत्व तयार केले नाही. मात्र, हल्ली "मी'पणावर जोर देऊन इतरांना विचारात न घेण्याची व्यक्तिकेंद्रित प्रवृत्ती वाढत असल्याची खंत भाजपमधीलच लोक बोलून दाखवत आहेत. भाजपमधील नेत्यांची ही "मी'पणाची वृत्ती लोकशाहीला घातक आहे. ज्यांना अजून पूर्ण महाराष्ट्रही माहीत नाही, अशा नेत्यांकडून राज्यातील जनतेला "हा माझा शब्द आहे' असे सांगणे हास्यास्पद आहे, असा चिमटाही पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला.

"सामना'वरील बंदीची मागणी हे हुकूमशाही प्रवृत्तीचे लक्षण
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवसांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनावर बंदी आणावी अशी निवडणूक आयोगाकडे मुंबई भाजपने केलेल्या मागणीवर शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, की अशा प्रकारे वर्तमानपत्रावर बंदीची मागणी करणे हेच मुळात सत्ताकेंद्री आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे लक्षण आहे. सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षानेच बंदीची मागणी करणे हे दुर्दैव आहे. लोकशाहीत कोणत्याही वर्तमानपत्रावर बंदी घालणे हे लोकशाहीविरोधी आहे.

Web Title: sharad pawar political statement