लोकसभेसोबत विधानसभा होतील - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई - महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता नसली, तरी लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होतील, असे सूचक विधान करत आता केवळ दीड वर्षाचा कालावधी राहिल्याने तयारीला लागा, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

मुंबई - महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता नसली, तरी लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होतील, असे सूचक विधान करत आता केवळ दीड वर्षाचा कालावधी राहिल्याने तयारीला लागा, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. 'राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार आहे. हे सरकार कायम राहील, त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता नाही; पण देशभरात मे 2019 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या विधानसभेचीदेखील निवडणूक होईल,'' असे ते म्हणाले.

'सध्या भारतीय जनता पक्षाचे एकहाती वर्चस्व दिसते, तसेच अनेक राज्यांत त्यांना बहुमत मिळाले आहे, तरी हे यश असेच राहील याची खात्री नाही. पंजाब, गोवा व मणिपूरमध्ये भाजपला यश मिळाले नाही,''

असे स्पष्ट करताना पवार म्हणाले, 'वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पराभव होईल, असे वाटत नव्हते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा 1977 मध्ये दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस पंचवीस वर्षे सत्तेत येणार नाही, असे तज्ज्ञ म्हणत होते; पण जनतेने या दोन्ही वेळी सर्व अंदाज खोटे ठरवले. वाजपेयी सरकारचा पराभव करून मनमोहन सिंग यांचे सरकार आले, तर 25 महिन्यांत इंदिरा गांधींनी पुन्हा कॉंग्रेसचे सरकार स्थापन केले. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वाची स्पर्धा व तुलना यावर लोकांची मानसिकता असते. सध्याही मोदी सरकारमध्ये वाजपेयी यांच्यासारखेच शायनिंग इंडिया सुरू आहे,'' असा टोला पवार यांनी लगावला.

सध्या भाजपला अल्पसंख्याकदेखील मतदान करतात, हे साफ खोटे असल्याचा दावा करत हा सगळा प्रचाराचा भाग असल्याचे पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप समर्थक सर्व संघटनांनी अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून हिंदू ध्रुवीकरणाचे राजकारण केल्याचे उत्तर प्रदेश निवडणुकीत दिसले. पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्‍तीने अशाप्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण करणे उचित आहे की नाही हे पाहा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मोदी-राहुल यांच्यात तुलना नाही
'निवडणुकांत लोकांचे मत सकारात्मक करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची गरज असते. उत्तर प्रदेश निवडणुकीत मोदी यांनी ते पुन्हा सिद्ध केले. भाजपचे नेतृत्व जनमत तयार करण्यात उजवे ठरले. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर एका बाजूला मोदी व दुसऱ्या बाजूला राहुल गांधी अशी नेतृत्वाची तुलना केली, तर लोक कोणाला मतदान करतील याचा अंदाज तुम्ही करू शकता,'' असे सांगत पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत चिंता व्यक्‍त केली.

गोरक्षकांमुळे भीतीचे वातावरण
अल्पसंख्याक समाजामध्ये गोरक्षकांमुळे भीतीचे वातावरण आहे. गोरक्षक ही जमात हल्ली मोठ्या प्रमाणावर आली आहे. त्यांना सरकारचाही पाठिंबा आहे. उत्तर प्रदेश व राजस्थानात गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यांची प्रकरणे घडली. त्यामुळे अल्पसंख्याक समाज भीतीखाली आहे. कोणीही गाय मारत नाही; पण म्हैस मारली तरी गोहत्या केली, असे मानून भीती तयार केली जात आहे. "बीफ' हे केवळ मुस्लिमच खातात असे नसून गरीबवर्गाचे ते अन्न असल्याचे सांगत पवार यांनी गोरक्षकांच्या एकूणच वर्तणुकीबाबत चिंता व्यक्‍त केली.

दानवे फायद्याचेच
'कायम वादग्रस्त विधान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आता शेतकऱ्यांच्या बाबत शिवराळ भाषेत वक्‍तव्य केले. यावर राज्यभरात संतापाचे वातावरण असून, अजित पवार यांचा राजीनामा मागणारे आता गप्प का,'' असा सवाल पवार यांनी केला. ""मात्र, दानवे यांचा राजीनामा मागण्याची गरज नाही. कारण दानवे हे विरोधकांच्या फायद्याचे बोलत आहेत,'' असा मार्मिक टोला पवार यांनी या वेळी लगावला.

Web Title: sharad pawar talking