निकालांचा कल पाहून जय महाराष्ट्रबद्दल निर्णय 

मृणालिनी नानिवडेकर - सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई - या सत्तेत जीव रमत नसल्याचे शिवसेनेने लपवून ठेवले नसले, तरी व्हेंटिलेटर केव्हा काढायचा याचा निर्णय महाराष्ट्रातील "मिनी विधानसभा', तसेच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच घेतला जाईल. 

मुंबई - या सत्तेत जीव रमत नसल्याचे शिवसेनेने लपवून ठेवले नसले, तरी व्हेंटिलेटर केव्हा काढायचा याचा निर्णय महाराष्ट्रातील "मिनी विधानसभा', तसेच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच घेतला जाईल. 

भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता ओसरत चालली असल्याचा शिवसेनेतील काही महत्त्वाच्या नेत्यांचा अंदाज आहे. निकालांनी या अंदाजावर शिक्‍कामोर्तब केले, तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. सत्ताधारी भाजपबद्दलचा रोष मतात वळविण्याची क्षमता कॉंग्रेसमध्ये नसल्याने प्रादेशिक पक्षांचा महासंघ उभारण्याच्या तयारीत शिवसेना आहे. महाराष्ट्रात पाठिंबा काढल्यावर मुदतपूर्व निवडणुकीची वेळ आलीच, तर भाजपविरोधी भावनेतून मतदार शिवसेनला मदत करतील, असा अहवाल काही मंडळींनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 

शिवसेनेने अत्यंत पद्धतशीरपणे पावले उचलत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या संबंधीची निवेदने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविण्यास प्रारंभ केला आहे. निकालांचा कल पाहता हा विरोध तीव्र करत पाठिंबा काढावा, असे शिवसेनेतील एक वर्ग मानतो. मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपने थेट आव्हान दिले असल्याने आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी आक्रमक रूप घेतले गेल्याचे प्रारंभी मानले जात होते. मात्र टीकेचा तीव्र स्वर लक्षात घेता शिवसेना यापुढे वेगळी वाटचाल करण्याच्या मुद्द्यांवर ठाम आहे, असे मानले जाते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवसेनेने काही प्रमाणात धोका पत्करणे आवश्‍यक असल्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला गेला असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. मात्र पाठिंबा काढल्यास भाजपने गेल्या काही वर्षांत अंगीकारलेल्या विशेष शैलीत शिवसेनेमागे विविध चौकश्‍यांचा ससेमिरा लावला जाण्याची शक्‍यताही आहे. ती बाब लक्षात घेत देशातील मतदारांचा कल स्पष्ट झाल्यावरच पाठिंब्याचा निर्णय घेतला जावा, असे मानणाराही एक वर्ग शिवसेनेत आहे. 

उद्धवजी सांगतील त्या क्षणी राजीनामा, असे सांगत खिशात तयार असलेला राजीनामा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल माध्यमांना दाखवला होता. मात्र हे राजीनामे उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिले आहेत. त्यामुळे मंत्र्यांचे राजीनामे पुढे पाठवायचे का, याचा निर्णय पक्षप्रमुख घेणार आहेत. महापालिकेच्या अखेरच्या प्रचारसभेत सर्व मंत्री राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवतील. 

सरकारला धोका नाही - तावडे 
भाजपचे ज्येष्ठ नेते शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मात्र या सर्व शक्‍यता फेटाळून लावल्या आहेत. कल्याण- डोंबिवली निवडणुकीत आम्ही ज्या प्रमाणे एकत्र आलो, त्याच प्रमाणे महापालिकेनंतर सारे सुरळीत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे. अर्थात, कोणत्याही परिस्थितीत सरकारला धोका नाही हे नमूद करण्यास ते विसरले नाहीत. 

Web Title: shiv sena & bjp politics