'जीएसटी'वरून शिवसेना भाजपला खिंडीत गाठणार?

ब्रह्मा चट्टे
सोमवार, 15 मे 2017

विरोधकांच्या संघर्ष यात्रा व बच्चू कडूंच्या आसूड यात्रेनंतर शिवसेनेचा शिवसंपर्क दौरा सुरू आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना शिवसंपर्क दौऱ्याच्या माध्यमातून आपली पाळंमुळं घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेली शिवसेना आता 'आधी कर्जमुक्ती मगच जीएसटी' अशी भूमिका घेणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी जीएसटी विधयकाच्या मंजूरीसाठी तीन दिवसीय आधिवेशनात आता शिवसेनेच्या विरोधाला भाजप सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जीएसटी विधेयकावरून शिवसेना भाजपला खिंडीत गाठणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी कर्जमाफीसाठी दोन दिवसीय आधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. जीएसटीमुळे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात घट होणार असून महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असणारा जकात कर रद्द होणार आहे. त्यामुळे शिवसेने सरकारला नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानुसार नमती बाजू घेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'मातोश्री'वर जात शिवसेनाप्रमुखांची मनधरणी केली होती. यानंतर आता सरकारला जीएसटी विधयेक पास करण्यास अडचण नसल्याचे खात्री झाली होती. मात्र आता शिवसेनेच्या या नव्या व्यूहरचनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे. 

विरोधकांच्या संघर्ष यात्रा व बच्चू कडूंच्या आसूड यात्रेनंतर शिवसेनेचा शिवसंपर्क दौरा सुरू आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना शिवसंपर्क दौऱ्याच्या माध्यमातून आपली पाळंमुळं घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेप्रमाणे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शिवसैनिक पोहचणार आहेत. 

'मी कर्जमुक्त होणारच' असे अभियान शिवसेनेतर्फे राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवत्त करण्याचे काम शिवसेना हात घेतले आहे. त्यामुळे विधीमंडळातही शिवसेनेला कर्जमाफीचा 'आवाज' बुलंद करावा लागणार आहे. त्यामुळेच आगामी जीएसटी विधयेक मंजूरीच्या आधिवेशनात शिवसेना आदी कर्जमुक्ती मगच जीएसटी अशी भूमिका शिवसेना घेणार असल्याचे समजते.