'शिरच्छेदाचा बदला सुका दम देऊन घेतला काय?'

टीम ई सकाळ
शुक्रवार, 5 मे 2017

भारतविरोधी शक्तींना नेहमीच फूस

हा संताप आणि दम इतका जबरदस्त होता की, हे बासित महाशय विदेश मंत्रालयाच्या दारातून प्रसन्नचित्ताने बाहेर पडतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. बासित महाशय दिल्लीत बसून भारतविरोधी शक्तींना नेहमीच फूस लावत असतात, पाकिस्तानचा जन्मदिवस साजरा करतात व कश्मिरातील फुटीरतावाद्यांना खास निमंत्रित म्हणून बोलावतात, कश्मीरप्रश्नी आमच्याविरुद्ध गरळ ओकतात.

मुंबई : भारतीय जवानांच्या शिरच्छेदाचा बदला पाकिस्तानी उचायुक्ताला सुका दम देऊन घेतला जातो हे आता समजले, असा सणसणीत टोला लगावतानाच 'दोन जवानांचा शिरच्छेद झाल्यावर दिल्लीने काय कारवाई केली?' असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

देशवासीयांना वाटले होते, दोन शिरच्छेदाच्या बदल्यात पाकडय़ांची पन्नास मुंडकी येथे आणून विजयोत्सव साजरा केला जाईल, पण हरकत नाही. पुरावे गोळा केले आहेत, रक्ताचे नमुने घेतले आहेत, चर्चाही सुरू आहेत. बदल्याचे काय ते नंतर पाहता येईल, अशी उपरोधिक टीका शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे. 

बासितमियाँची तर प्रसन्नमुद्रा
'सामना'ने उपहासाने म्हटले आहे की, भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद झाल्यावर दिल्लीने तत्काळ कारवाई केली. पाकिस्तानचे दिल्लीतील मुजोर उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून संताप व्यक्त केला. हा संताप आणि दम इतका जबरदस्त होता की, हे बासित महाशय विदेश मंत्रालयाच्या दारातून प्रसन्नचित्ताने बाहेर पडतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. बासित महाशय दिल्लीत बसून भारतविरोधी शक्तींना नेहमीच फूस लावत असतात, पाकिस्तानचा जन्मदिवस साजरा करतात व कश्मिरातील फुटीरतावाद्यांना खास निमंत्रित म्हणून बोलावतात, कश्मीरप्रश्नी आमच्याविरुद्ध गरळ ओकतात. अशा प्रत्येक वेळी या बासित मियाँना बोलावून केंद्र सरकारने निषेध व्यक्त केला आहे, पण उपयोग काय! पाकिस्तानचे रक्तपाती उद्योग थांबले काय, असा प्रश्न शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे.

प्रत्येक हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानी
'सामना'मध्ये म्हटले आहे की, '‘उरी’ हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा भारताचा आरोपदेखील पाक सरकारने फेटाळला. भारताने पाकिस्तानी सहभागाचा आरोप करायचा, त्याचे पुरावे द्यायचे आणि पाकिस्तानने ते नाकारायचे. पुन्हा ‘पाकिस्तानवर आरोप करण्याची भारताची सवयच आहे’ अशी खिल्लीही उडवायची. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. भारतातील आजवरच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानी आयएसआय, लष्कर किंवा पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनाच राहिल्या आहेत.