शिवसेनेत मंत्री विरूद्ध आमदार 

तुषार खरात - सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम 
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - शिवसेनेतील जवळपास सगळे 12 मंत्री कुचकामी आहेत. यांनी आतापर्यंत मंत्रीपदाची अडीच वर्षे उपभोगली. जनहिताच्या व पक्षाच्या दृष्टीने या मंत्र्यानी काडीमात्र कार्य केलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून हटविण्यात यावे, या मुद्‌द्‌यावर शिवसेनेतील विधानसभेच्या सुमारे 60 आमदारांनी एकजूट केली आहे. एवढेच नव्हे तर, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विधीमंडळातील पक्ष कार्यालयात सर्व आमदारांनी बैठक घेऊन शिवसेनेच्या मंत्र्यांना काढून टाकण्याच्या मागणीसाठी पुढील आठवड्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. 

कुचकामी मंत्र्यांना बदलून त्याऐवजी अन्य कोणत्याही लायक आमदारांना पुढील पाच वर्षासाठी मंत्रीपदे द्यावीत, अशी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहोत. नव्याने कुणाला मंत्रीपद द्यायचे या विषयी आम्हा सगळ्या आमदारांचा कोणताही आग्रह नाही. स्वतः ठाकरे साहेबांनी ही नवीन नावे निश्‍चित करावीत. ठाकरे साहेब जी नावे निश्‍चित करतील, ती आम्हा सर्व आमदारांना मान्य असतील, असे काही आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांसाठी ठाकरे यांनी प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती. पण एकाही मंत्र्याने ग्रामीण भागात जाऊन प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. सगळे मंत्री मुंबई आणि ठाण्यातच घुटमळत होते. भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांना नेमून दिलेल्या भागामध्ये उत्तम प्रचार करीत होते. भाजपने त्यांच्या उमेदवारांसाठी निधी पुरवठा केला होता. पण शिवसेनेच्या नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण भागात शिवसेनेचे जे काही उमेदवार निवडून आले ते आम्ही स्वबळावर आणले. मंत्री अथवा नेत्यांनी काहीच सहकार्य केले नव्हते. पक्षात अशीच स्थिती राहिली तर पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही सुद्धा निवडून येऊ की नाही, याची खात्री देता येणार नाही, अशीही भिती या आमदारांनी व्यक्त केली. 

आम्ही निवडून आलो असल्याने मतदारसंघात जनतेची कामे करावी लागतात. सत्तेत आमचा सहभाग असल्यामुळे जनहिताची कामे करण्यासाठी मोठी संधी आहे. पण पक्षाचेच मंत्री आमची कामे करीत नाहीत. विधानसभेतील आम्हा सगळ्याच आमदारांना हा वाईट अनुभव येत आहे. गेल्या वर्षीही आम्ही मंत्र्यांविषयी ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. पण त्यावेळी त्यांनी समजूत काढली होती. पण यावेळी मात्र आम्ही मंत्र्यांना बदलण्याच्या मागणीवर ठाम आहोत. त्यासाठी पुढील आठवड्यात त्यांना भेटायला जाणार आहोत, असेही या आमदारांनी सांगितले.