रामगोपाल वर्मांची जागा तुरुंगातच - शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

"प्रशांत परिचारक या आमदारावर त्याने सैनिक पत्नींचा अपमान केल्याबद्दल आता निलंबनाची कारवाई झाली आहे. शेवटी राजकारण्यांना झोडपून काढणे सध्या सहज आणि सोपे झाले आहे, पण "अभिव्यक्ती' व "कला' या गोंडस नावाखाली खान, भन्साळी व रामगोपाल वर्मा सटकतात. प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींचा केलेला अपमान जितका निषेधार्ह आहे तितकेच रामगोपाल वर्माने केलेले वक्तव्य संतापजनक आहे', असेही अग्रलेखात म्हटले आहे.

मुंबई - महिला दिनाच्या निमित्ताने ट्विट केल्याने वादात सापडलेले चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे. "रामगोपाल वर्मासारख्यांना निदान महाराष्ट्रात ताठ मानेने जगण्याचा अधिकार नाही. रामगोपालसारख्यांची जागा तुरुंगातच आहे. "पारदर्शक' सरकारने हे लक्षात ठेवले पाहिजे!', अशा शब्दांत शिवसेनेने वर्मा यांच्यावर टीका केली आहे.

रामगोपाल वर्मा यांनी महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना 'महिलांनो, सनी लिओनी सारखा आनंद द्या' असे ट्विट केले होते. या ट्विटनंतर वर्मा यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. शिवसेनेने "सामना'तील अग्रलेखाद्वारे तीव्र शब्दांत वर्मांवर निशाणा साधला आहे. "एक फालतू व घाणेरडे वक्तव्य करून या वर्माने आमच्या संस्कृतीवरच पिचकाऱ्या मारल्या आहेत. जागतिक महिला दिन वगैरे राहू द्या बाजूला, पण देशातील सर्वच मायभगिनींचा हा अपमान आहे. रामगोपाल वर्मा काय किंवा त्याच्या सिनेमाधंद्यातील इतर भाईबंद काय; कला, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जो चिखल तुडवीत असतात तो त्यांचा धंदा आहे', अशा शब्दांत वर्मा यांच्यावर शिवसेनेने टीका केली आहे.

वर्मा यांच्याशिवाय पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरही सेनेने टीका केली आहे. परिचारक यांनी लष्करातील जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. विधान परिषदेचे सदस्य असलेल्या परिचारक यांचे आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यांना दहा जणांच्या चौकशी समितीलाही सामोरे जावे लागणार आहे. परिचारक यांना शिवसेनेने लक्ष्य केले आहे.  तर 'पद्मावती' या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून चर्चेत आलेले दिग्दर्शक संजय भन्साळी यांनाही शिवसेनेने लक्ष्य केले आहे. "चित्रपट हा व्यवसाय आहे हे मान्य केले तरी त्यासाठी इतिहास आणि समाज ज्यांना आदर्श मानतो त्यांचे तुम्ही किती विद्रूपीकरण करणार? कला आणि कलास्वातंत्र्याच्या नावाखाली किती व्यापारीकरण करणार?', अशा शब्दांत भन्साळींना लक्ष्य केले आहे. "रामगोपाल, भन्साळी, परिचारक व इतर पारदर्शक विकृती!' असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.

"प्रशांत परिचारक या आमदारावर त्याने सैनिक पत्नींचा अपमान केल्याबद्दल आता निलंबनाची कारवाई झाली आहे. शेवटी राजकारण्यांना झोडपून काढणे सध्या सहज आणि सोपे झाले आहे, पण "अभिव्यक्ती' व "कला' या गोंडस नावाखाली खान, भन्साळी व रामगोपाल वर्मा सटकतात. प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींचा केलेला अपमान जितका निषेधार्ह आहे तितकेच रामगोपाल वर्माने केलेले वक्तव्य संतापजनक आहे', असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Web Title: Shivsena Critic on Ramgopal Verma