'एनडीए'ची आज हत्या झाली: संजय राऊत

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

एनडीए आता फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणूक किंवा एखादे विधेयक मंजूर करण्यासाठीउरली आहे. हा विस्तार फक्त भाजपचा आहे. आम्ही सर्वजण महाराष्ट्रात काम करत आहोत. आम्ही मंत्रीपदासाठी हापापलेलो नाही. लोकशाहीमध्ये बहुमत हे आज आहे, तर उद्या नाही. हे मटक्याचे आकडे आहेत. ही बादशाही कोणाची चालत नाही. प्रत्येकाची वेळ येते.

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) फक्त कागदापुरती आणि बैठकीपुरती राहिली आहे. आजचा मंत्रिमंडळ विस्तार हा फक्त भाजपचा होता, आज एनडीएची हत्या झाली, अशी जोरदार टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात आज (रविवार) नऊ नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले असून, चार राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली. फक्त भाजपच्याच खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एनडीएतील मित्रपक्ष शिवसेना, जेडीयू, अण्णा द्रमुकला स्थान देण्यात आलेले नाही. शिवसेनेकडून याबद्दल तीव्र नाराजी दर्शविण्यात आली असून, त्यांचे मंत्री या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, की एनडीए आता फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणूक किंवा एखादे विधेयक मंजूर करण्यासाठीउरली आहे. हा विस्तार फक्त भाजपचा आहे. आम्ही सर्वजण महाराष्ट्रात काम करत आहोत. आम्ही मंत्रीपदासाठी हापापलेलो नाही. लोकशाहीमध्ये बहुमत हे आज आहे, तर उद्या नाही. हे मटक्याचे आकडे आहेत. ही बादशाही कोणाची चालत नाही. प्रत्येकाची वेळ येते. आमचा पक्ष वाट बघणारा नसून, वाट लावणारा आहे. सत्तेसाठी शिवसेना कोणापुढे झुकणार नाही. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल.