शिवसेनेच्या 'थिंक टॅंक'मध्ये अनिल देसाई, परब, मिर्लेकर

- दीपा कदम
बुधवार, 18 जानेवारी 2017

सुभाष देसाई, संजय राऊत, कीर्तिकर यांना वगळले

सुभाष देसाई, संजय राऊत, कीर्तिकर यांना वगळले
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे मर्मस्थान असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्णपणे नवीन "थिंक टॅंक' सोबत घेतला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी आणि युतीची चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले सुभाष देसाई, संजय राऊत, गजानन कीर्तिकर यांना पद्धतशीरपणे बाजूला सारल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युतीची चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मोदी लाटेतही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावली होती. त्यानुसारच "ग्राउंड'वर काम करणाऱ्या नेत्यांवरच महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जुन्या नेत्यांना वगळून तरुण; मात्र शिवसेनेची नस जाणणाऱ्या शिवसैनिकांवर महापालिकेची व्यूहरचना ठरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बाळासाहेबांबरोबरच उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्‍वासातल्या असलेल्या सुभाष देसाईंना प्रथमच शिवसेनेच्या अंतर्गत गोटातून वगळण्यात आले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आलेल्या सुभाष देसाई यांना मुंबई महापालिका निवडणुकीत "थिंक टॅंक'मध्ये वर्णी न लागल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. गेल्या दोन वर्षांत सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वपक्षापेक्षा दिलेल्या झुकत्या मापामुळे शिवसेनेला विधानसभेत अनेकदा दोन पावले मागे घ्यावे लागले असल्याने शिवसेनेचे नुकसान झालेले असल्याचा फटका सुभाष देसाईंना बसला असल्याचे सांगितले जात आहे. सत्तेत राहून पक्ष वाढ करावी या शिवसेनेच्या उद्देशालाच सुभाष देसाई सुरुंग लावत असल्याचाही आक्षेप त्यांच्यावर घेतला जात असल्याने युतीच्या चर्चेपासून त्यांना दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या पहिल्या फळीपासून सातत्याने शिवसेनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनाही नवीन गोटात सहभागी करून घेण्यात आलेले नाही. शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या महापालिका निवडणुकीपासून खासदार संजय राऊत यांनाही दूर ठेवण्यात आले असून, त्यांना मुंबईऐवजी गोव्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अशा आहेत जबाबदाऱ्या
अनिल देसाई - युतीच्या चर्चेत वाटाघाटी करण्याचे आणि भाजप-शिवसेनेतील प्रमुख दुवा असण्याची जबाबदारी अनिल देसाईंवर आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्‍वासातील म्हणून अनिल देसाई ओळखले जातात. अतिशय शांत, संयमी; मात्र चाणाक्षनीतीने धोरण राबविणारा नेता. तडजोडी आणि वाटाघाटीमध्ये तरबेज असल्याचे म्हटले जाते.

अनिल परब - यांच्यावर पश्‍चिम आणि पूर्व उपनगरांतील वॉर्डांची जबाबदारी आहे. वकील असल्याने उमेदवारी अर्ज भरून घेणे, निवडणुकीच्या आचारसंहितेची नियमावली आणि कायदेशीर बाबी तपासून उमेदवारी अर्ज बाद होऊ न देण्याची जबाबदारी परब यांच्यावर असेल.

रवींद्र मिर्लेकर - यांच्यावर दक्षिण आणि मध्य मुंबईची जबाबदारी आहे. जुन्या फळीतील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून मिर्लेकर यांची ओळख आहे. त्यांनी माजी विधान परिषद आमदार, नाशिक आणि जळगाव संपपर्कप्रमुखाची जबाबदारी पार पाडली आहे. गिरगावमध्ये राहणाऱ्या आणि दक्षिण मुंबईचा वॉर्डनिहाय मतदारांचा अभ्यास असलेल्या मिर्लेकर यांना शिवसेनाच्या प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे.