मोदींच्या बुलेट ट्रेनला मनसेच्या इंजिनची 'धडक'

श्रीधर ढगे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे इंजिन आता योग्यवेळी योग्य 'ट्रॅक'वर आले आहे. मुंबईमधील चेंगराचेंगरीचा जाब रेल्वे प्रशासनास विचारण्यासाठी राज यांनी येत्या पाच तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं आज जाहीर केलं. बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही, असा खमक्या इशारा देत त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद यानिमित्ताने व्यक्त केली आहे, असं धाडस आणि बिनदास्त वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकरणात फक्त राज ठाकरेच करू शकतात हे पुन्हा एकदा जनतेनं पाहिलं.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे इंजिन आता योग्यवेळी योग्य 'ट्रॅक'वर आले आहे. मुंबईमधील चेंगराचेंगरीचा जाब रेल्वे प्रशासनास विचारण्यासाठी राज यांनी येत्या पाच तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं आज जाहीर केलं. बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही, असा खमक्या इशारा देत त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद यानिमित्ताने व्यक्त केली आहे, असं धाडस आणि बिनदास्त वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकरणात फक्त राज ठाकरेच करू शकतात हे पुन्हा एकदा जनतेनं पाहिलं.

राज यांनी जी भूमिका घेतली त्याला उभ्या महाराष्ट्रातून चांगलंच समर्थन मिळत आहे. कारण आज जे काही सभोवताली घडत आहे ते पाहून कोणताही संवेदनशील माणूस व्यथीत होईल असंच चित्र आहे. नोटबंदी, जीएसटी आणि पेट्रोल-डिजल, गॅससह जीवनावश्यक वस्तूची महागाई, फसवी कर्जमाफी या सर्व मुद्द्यांवर जनतेत रोष आहे. मुंबईच्या घटनेने सरकार विरोधी संताप व्यक्त होत आहे. नेमकी हीच दुखती नस पकडून आता राज ठाकरे नावाचं वादळ रस्त्यावर उतरणार आहे. राज ठाकरे यांच्या बोलण्यात एक वेगळीच जरब आणि भारदस्तपणा आहे, तितकेच अभ्यासपूर्ण ते बोलतात.

आज बुलेट ट्रेन बाबत त्यांनी, 'घालायला चड्डी नाही आणि कोटचा कापड घ्यायला निघालात' अशी मार्मिक टोलेबाजी केली. खरंच बुलेट ट्रेनची सद्या गरज आहे का, कर्ज काढून बुलेट ट्रेनचा अट्टहास का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सोशल मीडियावर तर टीकेची खूपच झोड उडत आहे." विकास पगाला गया है..." वगैरे असं बरंच काही जोरात सुरु आहे. त्यात शुक्रवारी मुंबईत एल्फिन्स्टन स्टेशनवर राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे सामुदायिक हत्याकांड घडलं. निष्पाप जीवाचा बळी गेल्या. अनेक जण जखमी झाले. याचा जनमाणसात तर प्रचंड रोष आहे. त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी राज ठाकरे यांनी रेल्वे विरोधातील मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. हा मोर्चा भव्य निघेल हे आता निश्चित असून सरकारन सुध्दा धसका घेतला असेल. सोबतच बुलेट ट्रेनचा विषय आता संपला हे सांगून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुद्धा खुलं आव्हान दिलं आहे. राज यांच्या भूमिकेला पाठिंबा सुद्धा मिळत आहे. कारण चुकीच्या राजकीय धोरनानी लोकाचे जगणं कठीण होत चालल आहे.

सरकारने पायाभूत सुविधा आधी दिल्या गेल्या पाहिजेत. ते कोणतेही सरकार करताना दिसत नाही. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सोयी अजून अनेक गावात नाहीत. शाळाची तर ग्रामीण भागात दयनीय अवस्था आहे. आरोग्य सेवेचेही तेच हाल आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय. तरुणांना रोजगार नाही. कुपोषण, महागाई असे एक ना अनेक प्रश्न आहेत. ते अधिक जटील बनत आहेत. त्यात मुंबई सारख्या घटना अनेकवेळा घडूनही ठोस काही केल्या जात नाही. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतात, आता सुद्धा तेच सुरु असताना राज ठाकरे यांनी योग्य भूमिका घेत मनसेचे जोरदार कमबॅक केलं आहे. शिवसेना सत्तेत असल्याने 'धरले तर चावते अन सोडले तर पळते' अशी त्यांची गोंधळलेली स्थिती आहे. बाकी विरोधी पक्ष पाहिजे तसे आक्रमक नाहीत. त्यामुळे राज यांनी योग्य टायमिंग साधले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेसह विरोधी पक्षावर सडकून टीका केली. खोटे, दांभिक आहेत ते, असेही राज म्हणाले.

आता पाच तारखेला होणाऱ्या मुंबईतील मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनसेच्या इंजिनने मोदींच्या बुलेट ट्रेनला जोरदार धडक दिली आहे, एवढे मात्र खरे!