अजितदादा "सोशल' होताहेत..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - राजकारणात कार्यकर्त्यांना दरारा वाटणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हल्ली "सोशल' होत असल्याचे चित्र आहे. युवक व विद्यार्थ्यांमध्ये झालेली नकारात्मक प्रतिमा सकारात्मक व्हावी यासाठी अजित पवार यांनी संवाद साधण्यावर भर दिल्याने, "काय सांगता राव, अजितदादा भलतेच सोशल होताहेत' अशी चर्चा "राष्ट्रवादी'चे युवक व विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे. 

सत्तेत असताना अजित पवार व वाद हे समीकरणच बनले होते. राजकारणातला सर्वांत वादग्रस्त नेता अशी त्यांची प्रतिमा झाली होती. या नकारात्मक प्रचाराचा मोठा फटका अजित पवार यांना बसला. मात्र, गेल्या वर्षभरापासून ते विद्यार्थी व युवकांत मनमोकळेपणाने मिसळत आहेत. राज्यभरात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शाखांचे उद्‌घाटन करण्यास ते प्राधान्य देत आहेत. अनेक शाखांच्या उद्‌घाटनाला ते स्वत: हजर राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. याशिवाय, विद्यार्थी नेत्यांची सतत विचारपुस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत सोशल मीडियात त्यांच्या चांगल्या उपक्रमांचे कौतुक करत आहेत. कोणत्याही विद्यार्थी नेत्याला काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी अजित पवार स्वत: पुढाकार घेत आहेत. 

सोशल मीडियात फारसे न चमकणारे अजित पवार हल्ली फेसबुकवर सक्रिय झाले आहेत. युवकांच्या व विद्यार्थ्यांचे प्रश्‍न ते या माध्यमातून जाणून घेतात. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सवलत मिळावी यासाठी त्यांनी स्वत:हून रणनीती आखली होती. विविध विद्यापीठांच्या उपकेंद्राच्या निर्मितीसाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. तर, विद्यार्थी संघटनेला मोर्चे काढण्यास भाग पाडले. आतापर्यंत 40 हून अधिक मोर्चे विद्यार्थी राष्ट्रवादीने काढले यामागे अजित पवार यांचीच रणनीती असल्याचे सांगितले जाते. राजकारणात युवक व विद्यार्थ्यांचे स्थान निर्णायक असल्याने अजित पवार यांनी आता त्यांच्याशी जवळीक साधत सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यास प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे. 

Web Title: on social media ajit dada