नियमित कर्ज फेडणारे शेतकरी ठरतात मूर्ख

प्रमोद बोडके
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सोलापूर - अनेक जण दुसऱ्याला मूर्ख ठरविण्यात आणि दुसऱ्याचा मूर्खपणा उकरून काढण्यात माहिर असतात. फोंडशिरसमध्ये (ता. माळशिरस, जि. सोलापूर) मात्र परिस्थिती वेगळीच आहे. नियमित कर्ज फेडणारे शेतकरी मूर्ख आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे हित पाहणारे गाढव ठरत असल्याचा चक्क ठरावच फोंडशिरस सोसायटीने केला आहे. स्वतःचा मूर्खपणा आणि गाढवपणा मान्य करत सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणाचा निषेध सोसायटीने लेखी ठरावाद्वारे केला आहे. 

दुष्काळाच्या आणि पडलेलेल्या शेतीमालाच्या भावात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून दिलासा मिळेल. कर्जमाफीचा प्रश्‍न सोडविला की शेतकऱ्यांपुढील प्रश्‍न सुटतील असाच अंदाज बांधला जात होता. सध्या स्थिती मात्र वेगळीच आहे. कर्जमाफीतून प्रश्‍न सुटण्याऐवजी वाढलेच आहेत. त्यात राज्यात अभ्यासू सरकार सत्तेवर असल्याने यंदाच्या कर्जमाफीने भल्या भल्या शेतकऱ्यांना घाम फोडला आहे. फोंडशिरस सोसायटीचे दुखणेही असेच काहीसे आहे. 1931मध्ये स्थापन झालेली फोंडशिरस सोसायटी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत जुनी सोसायटी मानले जाते. 

महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल तीन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. सोसायटीचे सभासद नियमित कर्जदार असल्याने तीनपैकी एकाही वेळी फोंडशिरसच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा तोटाच झाला. तोटाही कशामुळे, तर घेतलेल्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केल्याने. त्यामुळे आता सोसायटीचे सभासद कर्जमाफीच्या धोरणाला प्रचंड वैतागले आहेत. नियमित कर्ज फेडल्याने कुटुंबातील मुलेदेखील आम्हाला मूर्ख ठरवत आहेत, त्यातूनच आता मानसिक दबाव वाढत असल्याची लेखी कबुलीच सोसायटीच्या सभासदांनी 5 सप्टेंबरला झालेल्या ठरावात दिली आहे. 

सर्वानुमते मंजूर झालेला हा ठराव सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला पाठविण्यात आला आहे. हा अजब आणि विचित्र ठराव पाहून बॅंकेचे अधिकारी आणि पदाधिकारीही चक्रावले आहेत. कर्जमाफीच्या योजनेने राज्यात अनेक नवनवीन प्रश्‍न निर्माण केले आहेत. त्यातीलच एक प्रश्‍न फोंडशिरसच्या शेतकऱ्यांचा आहे. या व अशा अनेक प्रश्‍नांवर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार काय उत्तर शोधणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.