सागरी सुरक्षेकरता राज्यात "एरोबोट'! 

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई - राज्यात सागरी सुरक्षेकरता यापुढे "एरोबोट'चा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) या बोटी खरेदी करण्याचा किंवा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बोटींचा वापर सागरी रुग्णवाहिका म्हणूनही केला जाईल. गुजरातमधील अहमदाबाद महापालिका या बोटींचा वापर करते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच या बोटी वापरल्या जातील. 

राज्यातील सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेला "एमएमबी'ने प्राधान्य देत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वेळेत मदत पोचणे महत्त्वाचे असते; मात्र कित्येकदा तांत्रिक अडचणींमुळे त्यात विलंब होतो. यावर मात करण्यासाठी "एमएमबी'ने तीन एरोबोट खरेदी करण्याचा किंवा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन स्थितीसह समुद्रात गस्तीकरता आणि सागरी रुग्णवाहिका म्हणून या बोटी वापरल्या जातील. "एमएमबी'ने राज्यात जलक्रीडा प्रकारावरही भर दिला आहे. त्याकरताही या बोटी उपयोगी ठरतील. तसेच खाडीकिनारी होणारी रेतीचोरी रोखण्यासाठी ही बोट गस्तीकरता वापरली जाईल. 

कमी पाण्यातही एरोबोट किनाऱ्यापर्यंत सहज पोचू शकते. ही बोट फक्त खाडी आणि नदीमध्ये वापरली जाते. बोटीत 10 जण बसू शकतात. या बोटीची गती सुमारे 30 नॉटिकल मैल असून, ती गेट वेपासून बेलापूरला अवघ्या 20 मिनिटांत पोचेल. या बोटीच्या गतीमुळे वेळेची बचत होणार आहे. बोरिवली, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारी येथे या बोटींचा वापर केला जाणार आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत एरोबोट उपयुक्त ठरेल. या बोटी भाडेतत्त्वावर घेण्याचा किंवा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सागरी रुग्णवाहिका आणि समुद्र गस्तीसह जलक्रीडेसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. राज्यात पहिल्यांदाच अशा बोटी वापरल्या जाणार आहेत. 
- अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमबी. 

Web Title: State of the Marine Safety erobota