राज्यात तिसरी आघाडी उदयास येणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

राज्यात शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी गणल्या जाणाऱ्या पक्षांचे सरकार आहे; तर विरोधक म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष भूमिका बजावत आहेत; तरीही तिसऱ्या आघाडीची राजकीय स्पेस शिल्लक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मुंबई - धर्मनिरपेक्ष पक्षांना राज्यात संजीवनी देण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी हा राजकीय पर्याय म्हणून उदयास येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकभारती हा पक्ष नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षात विलीन करण्यात आला आहे.

आमदार कपिल पाटील यांनी लोकभारती या पक्षाची धुरा सांभाळली होती; मात्र हा पक्ष विलीन झाल्यानंतर राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीचे राजकीय समीकरण भविष्यात जुळून येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

राज्यात शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी गणल्या जाणाऱ्या पक्षांचे सरकार आहे; तर विरोधक म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष भूमिका बजावत आहेत; तरीही तिसऱ्या आघाडीची राजकीय स्पेस शिल्लक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीची जोरदार हवा होती; मात्र आपला यश मिळाले नाही. आपचा राज्यात प्रयत्न फसला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा पक्ष उतरला नाही. ही बाब ध्यानात घेतली, तरीही आपच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली होती. विशेषतः शहरी भागात आपला चांगला प्रतिसाद लाभला होता. आपची ही जागा तिसऱ्या आघाडीची मोट बांधत घेण्याचा प्रयत्न आमदार पाटील करीत आहेत. 

राज्यात यापूर्वी तिसऱ्या आघाडीने लक्षणीय कामगिरी केली आहे. या आघाडीत धर्मनिरपेक्ष पक्ष सहभागी झाले होते. 1989 नंतर जनता दल, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आदी पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन करून लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत चांगले यश संपादन केले होते. मात्र नंतरच्या काळात राजकीय घडामोडींनी वेग घेताना या धर्मनिरपेक्ष पक्षांची वाढ झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत या पक्षांची वाताहत झाली; तरीही मागील अडीच वर्षांपासून ओसरत असलेल्या मोदी लाटेमुळे पुन्हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय सक्षमपणे पुढे येणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. 

Web Title: state will become the third alliance