मारहाण झालेल्या शेतकऱ्यावरच आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 24 मार्च 2017

विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गदारोळ होत असतानाच; मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्यासाठी गेलेले औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांना सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी रक्तबंबाळ होईपर्यंत जबर मारहाण केली. तर आज (शुक्रवार) या शेतकऱ्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गदारोळ होत असतानाच; मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्यासाठी गेलेले औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांना सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी रक्तबंबाळ होईपर्यंत जबर मारहाण केली. तर आज (शुक्रवार) या शेतकऱ्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीमध्ये भुसारे (मु.पो. घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांचे मोठे नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली; मात्र आपल्याला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी शासनाकडे केली होती. दोन वर्षे पाठपुरावा करूनही कोणीच दखल घेत नसल्याने भुसारे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचे ठरवले. त्यासाठी ते गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच सुरक्षारक्षांनी भुसारे यांना मुख्यमंत्री कार्यालयापासून मारहाण करत जबरदस्तीने मंत्रालयाच्या बाहेर नेल्याचे भुसारे यांनी "सकाळ'ला सांगितले. या मारहाणीमध्ये भुसारे यांच्या जबड्याला दुखापत होऊन रक्ताने त्यांचे कपडे माखले होते. सुरक्षारक्षकांनी त्यांना मंत्रालयाच्या बाहेर आणून मरीन ड्राइव्ह पोलिस ठाणे येथे नेल्याचे त्यांनी सांगितले.

आज भुसारे यांना कोणालाही भेटू दिले जात नसून त्यांना कोठे ठेवले आहे किंवा त्यांच्याबाबत अन्य कोणतीही माहिती देण्यास पोलिस नकार देत आहेत. त्याच्यावर 309 कलमांर्तगत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 'न्यायालयाचा निर्देश असल्याने मी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही', असे म्हणत मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास गंगावणे यांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच जर गुन्हे दाखल होत असतील तर सरकारची ही वृत्ती जनरल डायरची असून या वृत्तीचा मी निषेध करतो.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेते, विधापरिषद

Web Title: Suicide attempt charges crime against Haribhau Bhusari