सिंचन वाढल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत - गडकरी

सिंचन वाढल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत - गडकरी

पंडित दिनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - राज्यात गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचारच केला नाही. कृषीविकासाचा दर खाली नेला, ८० हजार कोटी रुपयांची अनुत्पादक गुंतवणूक करून ठेवली, त्यामुळे शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आम्ही जबाबदार नसल्याचे स्पष्ट करताना राज्यात जोपर्यंत ५० टक्‍के सिंचन होत नाही, तोपर्यंत आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार पूनम महाजन, अमर साबळे, पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे या वेळी उपस्थित होते. 

राज्यात कृषी विकासाचा दर साडेबारा टक्के आहे. पुढील अडीच वर्षांमध्ये हा दर २० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याची सूचना गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या वेळी केली. देशामध्ये पाण्याची कमतरता नाही. ७० टक्‍के पाणी समुद्रात वाहून जाते, त्यापैकी १५ ते २० टक्‍के पाणी वाचवले, तर ५० टक्‍के सिंचन शक्‍य असल्याचे ते म्हणाले. 

पक्षात गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘गुन्हेगार आमच्या बरोबर आला तर वाल्याचा वाल्मीकी झाल्याखेरीज राहणार नाही. संघटनेमध्ये आम्ही सर्वांनाच स्वीकारत असतो, ज्याच्यामध्ये दोष आहेत, ते कमी करतो, त्यांच्याकडे असणाऱ्या सद्‌गुणांना वाव देतो. आपण आतापर्यंत गुन्हेगारांची बाजू कधीच घेतलेली नाही. पक्षामध्ये नवीन येणाऱ्यांना स्वीकारायला हवे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते कमी झाल्याखेरीज भाजपची मते कशी वाढणार.’’ जनतेने पक्षाला आणि नेतृत्वाला मते दिली आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला मिळालेला विजय हा तुमच्यासाठी किंवा परिवारासाठी नाही. आपल्या विजयातून मिळालेल्या संधीचा उपयोग सुराज्य निर्माण करण्यासाठी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. 
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला हा नैराश्‍यातून झालेला आहे. या भागात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत, त्यामुळे त्याठिकाणी असे उद्योग सुरू झाल्याचे ते म्हणाले. 

पूर्वीचे सत्ताधारी अहंकारी
पूर्वी सत्तेत असणारे एसी गाडीची काच खाली करायला तयार नसायचे. आता तीच मंडळी रस्त्यावर आंदोलन करताना दिसत आहेत. सत्तेत असताना निर्माण झालेल्या अहंकारामुळे त्यांची ही परिस्थिती झाल्याचे गडकरी यांनी नमूद केले. 

देशाचा महसूल २० लाख कोटी
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आले, त्यावेळेस देशाचा महसूल १३ लाख कोटी होता. हा आकडा आता २० लाख कोटींपर्यंत जाऊन पोचला आहे. पुढल्या दोन वर्षांत महसुलाची रक्‍कम २८ लाख कोटीपर्यंत जाऊन पोचेल. देशात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला गती आली आहे, त्यामुळे हा बदल दिसत आहे. 

आत्मविश्‍वास वाढवा, अहंकार नको
निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार, खासदाराला मीच चांगले काम करतो, असे वाटते. विजयाचे आत्मपरीक्षण करत असताना संकल्प करण्याची आवश्‍यकता आहे. जनतेने इंदिरा गांधी, संजय गांधी यांनाही माफ केले नव्हते, त्यामुळे प्रत्येकाने गंभीर विचार करण्याची आवश्‍यकता आहे. काम करताना आत्मविश्‍वास वाढवा, अहंकार नको, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी दिला. मोठे नेते आणि छोटे मन ही एक समस्या असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com