तटकरे कुटुंबीयांमधील राजकीय वादावर पडदा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जानेवारी 2017

शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर मनोमीलन
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यातील कौटुंबिक राजकीय वादवर मंगळवारी अखेर पडदा पडल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला.

शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर मनोमीलन
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यातील कौटुंबिक राजकीय वादवर मंगळवारी अखेर पडदा पडल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला.

अनिल तटकरे यांचे चिरंजीव संदीप तटकरे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या काळात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे तटकरे कुटुंबात राजकीय वाद उफाळण्याचे संकेत होते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या वादाचा पक्षावर परिणाम होऊ नये म्हणून आज स्वत: शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदार अनिल तटकरे यांच्या आक्रमक स्वभावामुळे सुनील तटकरे यांनी विधानसभेऐवजी विधान परिषदेवर जाणे पसंत केले होते. त्यानंतर अनिल तटकरे यांचे चिरंजीव अवधूत हे विधानसभेवर विजयी झाले.

पहिल्या मुलाचे राजकीय पुनर्वसन केल्यानंतरही अनिल तटकरे यांनी दुसरे चिरंजीव संदीप तटकरे यांच्यासाठी रोह्याच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली. मात्र ही संधी मिळत नसल्याने त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला. त्यातच अनिल तटकरे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्यपदी कायम आहेत. तसेच व्याह्यांच्या घरातही कायम उमेदवारी राहील असा आग्रह अनिल तटकरे यांचा आहे.

अशा परिस्थितीत सुनील तटकरे यांची पक्षात व कुटुंबातही मोठी अडचण होत होती.

अखेर शरद पवार यांनी या कौटुंबीक वादामध्ये मध्यस्थी केली. "एकत्र राहा, मतभेद संपवा,' असे सांगत त्यांनी वादावर पडदा पाडला. सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत हे राजकारणात सक्रिय नसले तरी कन्या आदिती मात्र सक्रिय आहे. सुप्रिया सुळे यांच्याबरोबर युवती "राष्ट्रवादी'त आदिती यांचे काम चांगले आहे. त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. आगामी काळात सुनील तटकरे यांचा राजकीय वारसा म्हणून आदिती समोर येऊ शकतात.

Web Title: takare family political dispute solve