उद्योजिका बनण्याचा तनिष्कांना कानमंत्र

उद्योजिका बनण्याचा तनिष्कांना कानमंत्र

आर्थिक स्वातंत्र्याचा मिळाला ‘रोडमॅप’

मुंबई - सामाजिक सुरक्षेबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा राजमार्ग दाखवणारे तनिष्का व्यासपीठाचे मुंबईतील अधिवेशन गुरुवारी संपले.

महाराष्ट्रातील महिलावर्गाला प्रतिष्ठा मिळवून देतानाच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा ‘रोडमॅप’ सापडल्याचा आत्मविश्‍वास मिळाला, अशी भावना व्यक्त करत या पहिल्या ‘तनिष्का’ अधिवेशनाचा समारोप झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का’ या स्त्री प्रतिष्ठा आणि नेतृत्वविकास करणाऱ्या व्यासपीठातर्फे दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात तज्ज्ञांनी सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याच्या मूलभूत मार्गदर्शनासोबतच व्यवसाय व उद्योग सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले.
 

तनिष्का व्यासपीठाने राज्यातील महिलांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सामाजिक सुरक्षेसोबतच आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प सोडला आहे. सलग चार वर्षांत तनिष्का व्यासपीठाने राज्यातील अनेक गावांत सकारात्मक व विधायक कामे केली असून या कुशल तनिष्कांना प्रशिक्षित करून उद्योजक बनवण्याकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी हे दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनातून प्रचंड आत्मविश्‍वास मिळाला, असे तनिष्का प्रतिनिधींनी सांगितले. या अधिवेशनात राज्यातील दुष्काळमुक्तीच्या कार्यक्रमासोबतच महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सापडला, असे त्या समारोप समारंभात मोठ्या आत्मविश्‍वासाने म्हणाल्या. 
सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी तनिष्का या अभिनव व क्रांतिकारी व्यासपीठाद्वारे महिलांना प्रतिष्ठा व नेतृत्वविकासाची आमूलाग्र संधी दिली, अशा शब्दांत तनिष्का प्रतिनिधींनी आभारही मानले. 

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एलिफंट डिझाईनच्या सहसंस्थापिका व संचालिका अश्‍विनी देशपांडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, जलतज्ज्ञ अभ्यासक राजेंद्र होलानी, राज्य सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी आशुतोष राठोड, टायकॉनचे ग्लोबल विश्‍वस्त विश्‍वास महाजन, `फॉर शी' या आशियातील पहिल्या महिला टॅक्सीचालक कंपनीच्या मालक रेवती रॉय, पॅलेडियम या जागतिक सल्लागार कंपनीच्या कतारमधील प्रमुख बार्बरा स्टॅनकोविकोवा, मुख्यमंत्री कार्यालयातील तंत्रज्ञान विभागाच्या सल्लागार श्‍वेता शालिनी, केलॉग्स कंपनीच्या एम. डी. संगीता पेंडुरकर, कराटेपटू अंजली देवकर या मान्यवरांनी राज्यभरातून आलेल्या तनिष्कांना मार्गदर्शन केले.

या अधिवेशनातून मिळालेला आत्मविश्‍वास व आर्थिक प्रगतीसाठी आवश्‍यक शिदोरी घेऊन तनिष्का प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या गावागावात स्त्री सक्षमीकरणाची दूरगामी परिणाम करणारी चळवळ उभारण्याचा संकल्प सोडत अधिवेशनाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुश्री फडणीस यांनी केले; तर  ‘सकाळ’च्या सहयोगी संपादक वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.

सरकारने मदतीची तयारी दाखवली आहे. या उपक्रमातून आरोग्यदायी उत्पादने तयार केली जातील.  ‘गुगल’सोबत करार करून महिलांसाठी एक उपक्रम राबवण्यात येईल. त्याची सुरुवात मेच्या अखेरपर्यंत होईल. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्वविकासासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

महिलांना स्वयंसिद्ध बनवण्यासाठी मार्ग दाखवण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन तीन-चार महिन्यांत महिलांनी तयार केलेल्या पदार्थांना बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न करू. यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन यातील सर्व अडचणी सोडवल्या जातील.
- बार्बरा स्टॅनकोविकोवा, व्यवस्थापकीय संचालिका, पॅलेडियम, कतार

पुढील १५ वर्षे देशासाठी महत्त्वाची आहेत. या काळात अधिक वेगाने प्रगती करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. समाजहितासाठीच्या सूचनांचे नेहमीच स्वागत केले जाते. महिलांच्या सक्षमीकरणावर भर आहेच. त्यासाठी नक्कीच अधिक प्रयत्न करू. 
- श्वेता शालिनी, मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com